*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*त्या गावाला नको आठवू*
—————————————
(लवंगलता वृत्त)
त्या गावाचे दिवस आठवू नको नकोसे वाटे
अजून फुलती अंगावरती आठवणींचे काटे
रणरण उघड्या माळावरती गाव कसे ते वसले
दिवस सुखाचे, आनंदाचे कधीच नाही दिसलें
रस्ता नाही, पाणी नाही, शेण मुताचे गोठे
अजून फुलती अंगावरती आठवणींचे काटे
भाजी पाला :किराण वस्तू अवघड होते मिळणे
मिळेल जे ते कदान्न सारे प्राप्त जाहले गिळणे
डॉक्टर नाही, औषध नाही जंतर मंतर खोटे
अजून फुलती अंगावरती आठवणींचे काटे
महा डांबरट गावकरी पण रुबाब त्यांचा मोठा
पिळत मिशांना सांज सकाळी आव आणती खोटा
रिकाम टक्कु, गणंग गप्पा सदैव भरती ओटे
अजून फुलती अंगावरती आठवणींचे काटे
हुकूम मिळता मज बदलीचा ” सुटलो ‘ म्हणून वाटे
अजून फुलती अंगावरती आठवणींचे काटे
श्रीनिवास गडकरी
पुणे
