*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*व्यासंगी–दुर्गाबाईं भागवत*
दुर्गा भागवत हे नाव उच्चारता क्षणी एक अभ्यासू, करारी आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभं राहतं. आपल्या नीतिमान आचरणाने त्यांनी साहित्यक्षेत्रावर स्वतःची अशी एक वेगळीच नाममुद्रा उमटवली… महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ संपूर्ण विसावं शतक अनुभवणाऱ्या दुर्गाबाईं सामाजिक सांस्कृतिक-राजकीय प्रश्नांसंबंधी भूमिका घेत राहिल्या आणि आपल्या लेखनातून सतत व्यक्त होत राहिल्या.
दुर्गाबाई म्हणजे व्यासंग.. !! मानववंश शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ… अनेक देशी-परदेशी भाषा त्यांना अवगत होत्या. संशोधन, अभ्यास करून केलेल्या त्यांच्या या लेखनाला जगन्मान्यता मिळाली…
महात्मा गांधी, टॉलस्टॉय, हेनरी डेव्हिड थोरो, मिल, रॉबर्ट ब्राउनिंग, राजारामशास्त्री भागवत, डॉ. श्री.व्यं. केतकर ही दुर्गाबाईंची काही
प्रेरणास्थाने होती..
दुर्गाबाई म्हटलं की मला आठवण होते ती एका सुंदरशा कॅलिडोस्कोपची… त्याचा कोन किंचितसा बदलला की त्यामध्ये दरवेळी नवेच सुंदर रूप दिसते ना… अगदी तसेच्चं बाईंचेही मला दिसते.. मानववंश शास्त्रज्ञ समाज शास्त्रज्ञ, गौतम बुद्धाचे चरित्र, त्याचे तत्त्वज्ञान, त्याचा न्यायविधी या विषयांबरोबरच संस्कृत, पाली, बंगाली, जर्मन, इंग्रजी भाषांत त्यांचे प्रावीण्य होते. त्याचबरोबर गोंड, बैगा, कोरकू अशा आदिवासींशी मनसोक्त गप्पा मारू शकतील अशा त्यांच्या बोलीभाषादेखील बाईंना अवगत होत्या…. गंभीर विषयांबरोबरच स्त्रीजीवनाशी निगडित अशा शिवणकाम, विणकाम, रांगोळ्या घालणं, हात-पाय-कपाळावरची गोंदणं, स्त्रीगीतं, उखाणे, व्रतवैकल्ये, उपासतापास याबरोबरच पाकशास्त्रचं नव्हे तर पाककला यांसारख्या बायकी विषयांबद्दलचे त्यांचे ज्ञान हे
वैशिष्टय़पूर्णच होते. त्या त्या कलांमध्ये त्यांनी आनंद तर घेतलाच इतकचं नाही तर त्याचबरोबर त्या त्या कलांशी जोडलेल्या धार्मिक, सामाजिक, श्रद्धांचे धागेदोरेदेखील त्यांनी उलगडून दाखवले…. दुर्गाबाईंचा दृढ विश्वास होता की कोणतीही कला ही रंग, रूप, सौंदर्य, स्वाद, सुगंधापुरतीच मर्यादित नसते तर ती माणसाच्या संपूर्ण जगण्याचा एक अविभाज्य भाग असते…
साने गुरुजींनी प्रेरित केल्याने दुर्गाबाई प्रथम ललितलेखनाकडे वळल्या. महानदीच्या तीरावर ही गोंडजीवनातीलची प्रेमकथा त्यांची पहिली ललितनिर्मिती… पुढे दीर्घ आजारपणातील बंदिस्त एकांतवासाने त्यांना नव्याने ललितलेखनाची प्रेरणा दिली…. दुर्गाबाईंनी आयुष्यभर विपुल लेखन केलं. ललित, वैचारिक, अनुवादित, लोकसाहित्यपर असे विविध त्यांच्या लेखनाचे कप्पे होते. लेखनासाठी त्यांना कुठलाही विषय वर्ज्य नव्हता तसंच त्यांची लेखनासाठी कितीही संशोधन करण्याची तयारी असायची… अभिजात रसिकता, सौंदर्यासक्ती, जीवनोत्सुक आशाप्रवण वृती, तीव्र संवेदनशीलता, तत्त्वज्ञवृती काव्यात्मता तसेच शास्त्रज्ञाचे डोळस, मर्मग्राही कुतुहल यांचे अपूर्व रसायन दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्त्वात आणि अनुषंगाने त्यांच्या ललित साहित्यात प्रत्ययास येते…
लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडलेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलभाषेची मोडणी आढळते, तशीच व्यासंग-चिंतन-मनन यांतून आलेली गहिरेपणाची डूबही… दुर्गाबाईंच्या लेखनातील मौलिकता अस्सल भारतीयत्व , सनातनत्वाचा वेध घेण्याची शक्ती यांमुळे ललित निबंधाच्या क्षेत्रात त्यांनी एक नवा मानदंड निर्माण केला आहे.
दुर्गा बाई वेगवेगळ्या शब्दांचा शोध घेत. हा शब्दशोध पुढे तेथील साहित्याकडे वळत असे आणि ते साहित्य मराठीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांनी बंगाली, गुजराथी अशा अनेक भाषांमधून साहित्य मराठीत आणले. अनेक मराठी शब्द डौलात वापरले. अतिशय संवेदनक्षम मन बाईंना लाभले होते. रंग, गंध, नादलुब्ध मन त्यांच्यापाशी होते आणि त्याचा अचूक उपयोग करून त्यांनी आपले जीवन समृद्ध केले…
आणीबाणीच्या काळातही दुर्गाबाईंनी लेखन-विचार स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला व त्यासाठी कारावासही पत्करला. विद्वत्ता, ज्ञानसाधना,
नवनिर्मिती यांचे अनुशासन नोकरशाहीच्या हाती असू नये व ख-या लोकशाहीची प्रतिमा सिध्द करण्यास विचारवंतांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. ‘मुक्ता’ (१९७७) व ‘जनतेचा सवाल’ (१९७९) ही त्यांच्या त्या काळातील भाषणलेखांची संकलने…
ईश्वराचे अस्तित्व, पूजाअर्चा यावर विश्वास न ठेवणाऱ्या बाई पण पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती पाहून विठोबाबद्दलच्या सगळ्या मिथक कथा आठवून मग म्हणतात तुकारामाने याला ‘”सुंदर ते ध्यान’” का म्हटले ते कळले…!!
जादुई भाषेचा वापर आणि किती प्रगल्भ विचार…!
त्यांच्या वाचनाला, लेखणीला आणि निरीक्षण कौशल्याला माझा त्रिवार सलाम… !!
लेखिका / कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे
9870451020
