You are currently viewing स्व-गणनेला वेग द्या; 100 टक्के पूर्णत्वाचे लक्ष्य — जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

स्व-गणनेला वेग द्या; 100 टक्के पूर्णत्वाचे लक्ष्य — जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

स्व-गणनेला वेग द्या; 100 टक्के पूर्णत्वाचे लक्ष्य — जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

 सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात सुरू असलेल्या स्व-गणना मोहिमेला गती देत ती शंभर टक्के पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. १ मे २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी — आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच इतर मान्यवर व्यक्ती यांची स्व-गणना तातडीने पूर्ण करण्यात यावी. यासोबतच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्व-गणना करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्व-गणनेचा प्रचार व प्रसार प्रभावीपणे करण्यावर विशेष भर देत त्यांनी सांगितले की, गावपातळीवर मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, अंगणवाडी सेविका आणि आशा (ASHA) वर्कर यांच्या माध्यमातून जनजागृती केली जावी. तसेच नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रात कर संकलक आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घ्यावा.

नवीन उपक्रम राबवून  स्व-गणनेचे महत्त्व, कालावधी आणि प्रक्रिया याबाबत माहिती देणारे संदेश प्रसारित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मोहिमेचा प्रभावी संदेश पोहोचेल असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.

शैक्षणिक संस्थांनाही या मोहिमेत सक्रियपणे सहभागी करून घेत,  स्वतःची स्व-गणना पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाची स्व-गणना करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी शेवटी सर्व संबंधित यंत्रणांना समन्वय साधून काम करण्याचे निर्देश देत, “स्व-गणनेचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने पुढाकार घ्यावा,” असे आवाहन केले.

0000

 

आंबा व काजू पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 

सिंधुदुर्गनगरी, दि. ०४ (जिमाका) : जिल्ह्यात यंदा कडाक्याची थंडी आणि अवेळी पडलेल्या पावसामुळे आंबा व काजू या प्रमुख फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत.

आंबा व काजू पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे , तंत्र अधिकारी विरेश अंधारी तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, पंचनामे करताना एनडीआरएफ/एसडीआरएफच्या निकषांचे काटेकोर पालन करावे. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. आंबा व काजू पिकांचे पंचनामे दोन हेक्टरपर्यंत मर्यादित स्वरूपात करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

0000000

चार कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने रद्द; तीन परवाने निलंबित

 

सिंधुदुर्गनगरी,दि.४(जिमाका):- जिल्ह्यात अनियमितता आढळलेल्या नऊ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांपैकी चार कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले असून तीन परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे.

कृषी निविष्ठा विक्री केंद्राच्या तपासणी मोहिमेत नऊ कृषी निविष्ठा विक्री केंद्रात अनियमितता आढळून आल्या होत्या. त्यानंतर कृषी निविष्ठा विक्री केंद्र धारकांची परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या समक्ष सुनावणी घेण्यात आली, यावेळी हे परवाने रद्द व निलंबित करण्यात आले.

तपासणी दरम्यान आढळलेल्या त्रुटींबाबत खुलासा वेळेत सादर न करणे व सुनावणी दरम्यान उपस्थित न राहिल्याने खालील निविष्ठा विक्री  केंद्रांचे परवाने रद्द केले आहेत. यामध्ये मे. क्षेत्रज्ञ ॲग्रो, चांदोशी ता. देवगड, मे. सद्गुरु कृपा कृषी सेवा केंद्र ता.कणकवली, मे. सृष्टी क्रॉप केअर, ता. सावंतवाडी, मे. खरडे सेल्स कार्पोरेशन मडूरा ता. सावंतवाडी यांचे किरकोळ खत विक्री परवाने रद्द  करण्यात आले आहेत.

खरीप हंगाम २०२६ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या खतांचा व कृषी निविष्ठांचा पुरवठा वेळेत होण्यासाठी कृषी विभागाने मोहीम स्वरुपात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. खत विक्री केंद्रावर साठा फलक व किंमत सूची अद्ययावत असणे. खतांचा साठा व विक्री नोंदवही प्रत्यक्ष साठ्यांशी जुळणे, लिंकिंग ला नाही म्हणा (say no to linking ) हा बोर्ड विक्री केंद्रावर प्रदर्शित करणे, अनधिकृत व विनापरवाना खत विक्रीवर बंदी, जास्त युरिया खरेदी करणाऱ्यांची तपासणी करणे व ई पॉस मशीन व प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळल्यास खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार कारवाई करण्याचे आदेश या विभागाने दिले आहेत.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पुरेसे खत व बियाणे साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी करताना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करावीत. खरेदीचे पक्के बिल घ्यावे, तसेच बिलावर लॉट नंबर आणि किंमत तपासून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

***

Regards :

District Information Office,
Sindhudurg.
diosindhudurg@gmail.com
02362-228859

Pl follow us on : 

Twitter :  https://twitter.com/InfoSindhudurg

blog :  https://diosindhu.blogspot.com

Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100009944297016

प्रतिक्रिया व्यक्त करा