You are currently viewing “राष्ट्र सेवा दलाचे शिबिर म्हणजे जबाबदार नागरिक घडवण्याचे व्यासपीठ” : संदीप परब

“राष्ट्र सेवा दलाचे शिबिर म्हणजे जबाबदार नागरिक घडवण्याचे व्यासपीठ” : संदीप परब

“राष्ट्र सेवा दलाचे शिबिर म्हणजे जबाबदार नागरिक घडवण्याचे व्यासपीठ” : संदीप परब

कणकवलीत राष्ट्र सेवा दलाचे निवासी शिबिर सुरू; अद्वैत फाऊंडेशनचा सलग नववा उपक्रम

कणकवली :

“खरा तो एकचि धर्म… जगाला प्रेम अर्पावे” या साने गुरुजींच्या विचारांची आजच्या समाजाला अधिक गरज असून, बालवयातच मुलांमध्ये मानवता, शिस्त आणि राष्ट्रप्रेम रुजवणे अत्यावश्यक आहे, असे मत संविता आश्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांनी व्यक्त केले.
अद्वैत फाऊंडेशन, कणकवली यांच्या वतीने गोपुरी आश्रम, वागदे येथे ३ ते ७ मे दरम्यान आयोजित राष्ट्र सेवा दलाच्या व्यक्तिमत्त्व विकास निवासी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, बाळू मेस्त्री, डॉ. महेंद्र मोहन गुजर, सरिता पवार, राजन चव्हाण, संजय सावंत, तसेच प्रशिक्षक शहाजी गोंगाणे, चंदन माटुंगे, बिसना थापा आणि श्रावणी कुडाळी उपस्थित होते.
प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी सांगितले की, राष्ट्र सेवा दलाचे शिबिर हे व्यक्तिमत्त्व घडवण्याबरोबरच माणुसकीची जाणीव जागवणारे व्यासपीठ आहे. येथे मिळणारे प्रशिक्षण युवकांना सुजाण नागरिक बनवते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टी देण्याचे काम करते.
डॉ. महेंद्र गुजर यांनी आपल्या मनोगतात शिस्त, संघटन आणि सेवाभाव ही राष्ट्र सेवा दलाची खरी ओळख असल्याचे नमूद केले. अशा शिबिरांमधून युवकांना केवळ ज्ञानच नव्हे, तर समाजात बदल घडवण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.
या निवासी शिबिरात सिंधुदुर्गसह रत्नागिरी, मुंबई आणि गोवा येथील विद्यार्थी सहभागी झाले असून, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजन चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मनीषा पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सरिता पवार यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा