नवोदित गायक-गायिकांसाठी व्यासपीठ; आकर्षक बक्षिसांसह सहभागाचे आवाहन
सावंतवाडी / (प्रतिनिधी):
सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट १ व सम्राट क्लब मये यांच्या संयुक्त विद्यमाने ‘२० वे सम्राट संगीत सितारा’ या शास्त्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची पहिली प्राथमिक फेरी रविवार, दि. १० मे २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता नगरपालिका सभागृह, सावंतवाडी येथे होणार आहे.
ही स्पर्धा नवोदित व हौशी गायक-गायिकांना त्यांच्या कलेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आली असून, सर्व संगीतप्रेमी व इच्छुक कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी ₹२५,०००, द्वितीय ₹२०,०००, तृतीय ₹१५,००० तसेच तीन उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी ₹५,००० व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.
सहभाग पूर्णतः विनामूल्य असून नोंदणीची अंतिम तारीख १ मे वरून वाढवून ५ मे २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. नोंदणी ऑनलाइन (Google Form) तसेच ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे. प्रत्येक केंद्रावर पहिल्या २० स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
स्पर्धकांचे वय १५ ते २५ वर्षे असणे आवश्यक असून वैध पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. ही स्पर्धा फक्त हौशी कलाकारांसाठी असून व्यावसायिक गायक अपात्र ठरणार आहेत.
स्पर्धा हिंदी/ब्रिज भाषेत असून शास्त्रीय गायनावर आधारित आहे. प्राथमिक फेरीत निवडलेल्या चार रागांपैकी एका रागाचे १५ मिनिटांचे सादरीकरण करावे लागेल. उपांत्य व अंतिम फेरीत ख्याल (१५ मिनिटे) व मध्य लय बंदिश (५ मिनिटे) सादर करावी लागेल. साथसंगत (तबला/हार्मोनियम) आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येईल. एकूण १२ सहभागी उपांत्य फेरीसाठी निवडले जातील, त्यापैकी ६ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. मागील वर्षी प्रथम क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकास यंदा सहभाग घेता येणार नाही.
प्राथमिक फेरीत निवडलेल्या स्पर्धकांना पुढील फेऱ्यांमध्ये संधी दिली जाईल. अंतिम फेरीत उत्कृष्ट स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सम्राट नरेश (९५११७५८८३६), सम्राट मंगेश (९८३४७५५१७८) व सम्राट सज्जन (७८७५२४१०४१) यांच्याशी संपर्क साधावा.
या संगीत स्पर्धेद्वारे नवोदित कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळणार असून नागरिकांनीही उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
