सत्ताधारी-विरोधक वाद आणि अंतर्गत गटबाजीमुळे कामांना ब्रेक – ठाकरे युवासेनेचे तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांचा आरोप
चार दिवसांत कामे सुरू न झाल्यास घेरावाचा इशारा
सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपरिषदेत सत्ताधारी व विरोधक यांच्यातील वाद तसेच सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत गटबाजीमुळे खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा येथील विकासकामे ठप्प पडल्याचा आरोप ठाकरे युवासेनेचे तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांनी केला आहे.
या भागातील विविध विकासकामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदारांना वर्क ऑर्डर देखील देण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात कामांना सुरुवात झालेली नाही. ठेकेदारांशी संपर्क साधला असता नगरपरिषदेकडून कामे सुरू न करण्याच्या सूचना मिळाल्याचे समजत असल्याचा आरोप सुभेदार यांनी केला.
खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा या भागातील नगरसेवक निष्क्रिय असून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली. जिल्ह्याचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेच या भागातील नगरसेवक असून, स्वतःच्या प्रभागाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, खासकीलवाडा शिल्पग्राम तिठा परिसरात दुर्गंधीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून वारंवार तक्रारी करूनही केवळ तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय स्ट्रीट लाईट, रस्त्यांवरील विद्युत खांब, झाडे-झुडपे, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था व खड्डे अशा अनेक समस्या प्रलंबित आहेत.
पावसाळा तोंडावर आला असताना गटारांची कामे रखडल्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून घरांमध्ये घुसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत कामांना सुरुवात न झाल्यास स्थानिक नागरिकांसह मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नगरसेवकांनी आपल्या मतदारसंघात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे त्वरित निवारण करावे, असे आवाहनही आशिष सुभेदार यांनी केले आहे.
