You are currently viewing एक पक्षीप्रेमी वेड्या माणसाची गोष्ट

एक पक्षीप्रेमी वेड्या माणसाची गोष्ट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”एक पक्षीप्रेमी वेड्या माणसाची गोष्ट”* 

 

गावाबाहेरच्या एका भल्यामोठ्या झाडाखाली

मी रोज जाऊन बसायचो

तिथे चिमण्या पाखरांची गंमत बघायचो

 

पाखरं मी येण्याची वाट बघायचे

मला पाहिल्यावर अवतीभवती

गोळा व्हायचे

पाखरांचा अख्खा थवा माझ्याकडे

टक लावून पहायचा

जणूकाही माझ्याशी बोलायचा

 

त्या पाखरांनाही माझी सवय झाली होती

त्यांची आणि माझी पक्की मैत्री जमली होती

पाखरं सारे मी येण्याची वाट बघायचे

दाणे खायला दिल्यावर उंच उडाण घ्यायचे

 

पोटभर दाणे आणि घोटभर पाणी पिऊन

पाखरे उडून जायची

चिवचिव करताना जणू मला

धन्यवाद म्हणायची

 

आता पाखरं आणि मी एकजीव झालो होतो

एकमेकांशिवाय रहात नव्हतो

रोज माझा पाखरांशी संवाद व्हायचा

येणारा जाणारा प्रत्येक माणूस मला

वेडा समजायचा

खरंतर मला त्यांच्याशिवाय करमत नव्हते

आणि मी दिल्याशिवाय ते काही खात नव्हते.

 

एक दिवस अचानक

गावालगत महामार्ग जाणार होता

त्यासाठी झाडाचा अडथळा येणार होता

ते झाड पाखरांच घर होतं

झाडाशिवाय पाखरांना दुसरं काही नव्हतं

 

झाडं तोडू नका म्हणून मी

त्या लोकांना विनंती करायचो

केविलवाणी पाखरांना रडताना बघायचो

 

एक दिवस बुलडोझर आले

झाडं तोडून नेले

पाखरे सारी उडून गेलीत……

कुठे उडालीत पाखरे काहीच कळत नव्हते

पाखरांचे आणि माझे नाते कायमचे संपले होते

 

मी इथे तिथे धावू लागलो

पाखरं शोधु लागलो

पाखरे कुठेच दिसत नव्हती

ओंजळीतले दाणेही पाखरांना बोलवत होती

पाखरे परत येतील म्हणून मी

उन थंडी पावसात तिथेच बसायचो

दाणे टाकून पाखरांना बोलवायचो

 

खरंच मी तेव्हा वेडा नव्हतो

पाण आता खरंच वेडा झालो

पाखरांच्या शोधात

गाव गाव हिंडू लागलो

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा