सात वर्षांनी झालेल्या आमसभेत लोकांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा; १२५ निवेदनांवर कारवाईचे निर्देश, विविध विभागांना फटकारले
कुडाळ :
लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाने काम केले पाहिजे. प्रशासन कामाला लागले की लोकप्रतिनिधींचे काम सोपे होते. त्यामुळे या आमसभेत अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे लक्षात ठेवावीत. त्याचा पाठपुरावा मी करत राहणार, असे स्पष्ट प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले.
तब्बल सात वर्षांनी कुडाळ तालुक्याची आमसभा आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महालक्ष्मी हॉलमध्ये झाली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि तब्बल पाच तास चाललेल्या या आमसभेत प्रसंगी आमदार राणे यांनी कठोर धोरण स्वीकारून लोकांच्या प्रश्नांबाबत कोणीही हयगय करू नये असा स्पष्ट इशाराच प्रशासनाला दिला.
या आमसभेच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या आमसभेला व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, प्रांताधिकारी ऐश्वर्या साळुंखे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, विषय समिती सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, रुहिता तांबे, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, जि.प. सदस्य दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, आरती पाटील, रुपेश कानडे, नागेश आईर, संजय पडते, काका कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला शोक प्रस्ताव मांडून झाल्यानंतर अभिनंदनाचे ठराव घेण्यात आले. त्यात आमदार निलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव जास्त होत असल्याने त्यांनी तो थांबवून आमदार, त्यांच्या कुटुंबीयांऐवजी विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्यांचे अभिनंदन करावे, अशी सूचना केली.
सभापती मिलिंद नाईक यांनी प्रस्ताविकातून आमसभेचा उद्देश स्पष्ट केला. मागील आमसभा ९ मार्च २०१९ रोजी झाली होती. त्यानंतर आलेल्या निवेदनांवर झालेल्या कार्यवाहीचे वाचन करण्यात आले. त्यावेळी एकूण ५७ निवेदने आली होती.
यावेळी कुडाळ नगरपंचायतीचा मुद्दा उपस्थित झाला. मुख्याधिकारी गैरहजर असल्याने आमदार राणे यांनी त्यांना तातडीने फोन करून बोलावून घेतले.
आकारपीड जमीन प्रकरण जिल्हाधिकारी स्तरावर लवकर मार्गी लावा, अशा सूचना आमदार राणे यांनी दिल्या. तसेच राष्ट्रीय महामार्ग व समांतर रस्त्यांबाबत चर्चा झाली.
महावितरण बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. खंडित वीजपुरवठा, स्मार्ट मीटर, भूमिगत वीज वाहिन्या, नवीन सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर बसविणे, कंत्राटी कामगार यावर चर्चा झाली. यावेळी अभियंता श्री. पिसाळ अनुपस्थित असल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केली.
एसटी विभागाबाबत लोकांनी तक्रारी मांडल्या. कुडाळ बसस्थानकाची दुरवस्था, स्वच्छतेचा अभाव, गाड्यांवर फलक नसणे याकडे लक्ष वेधण्यात आले. डीपीडीसीमधून ३ कोटींचा निधी मंजूर झाल्याने चांगले बसस्थानक उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महामार्ग विभागाबाबत कर्मचाऱ्यांची कमतरता आणि भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत तक्रारी झाल्या. झाराप तिठा येथील काम पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
वनविभाग व जलसंपदा विभागावरही नाराजी व्यक्त झाली. नरडवे प्रकल्प, रस्त्यांची अवस्था याबाबत चर्चा झाली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, कृषी व पशुसंवर्धन विभागाचाही आढावा घेण्यात आला.
निळेली येथे कोंबडी हॅचरी सुरू करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या स्थितीवर चर्चा झाली. महिला रुग्णालयाजवळ किचन संकल्पना राबविण्याची सूचना देण्यात आली.
बालविकास प्रकल्पाचे बजेट वाढविण्याची मागणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील गैरसोयींबाबत चर्चा झाली. दोन आठवड्यांत सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
कुडाळ शवविच्छेदन गृहात कटर नसल्याचा मुद्दा पत्रकार राजन नाईक यांनी उपस्थित केला. ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमध्ये निधीअभावी कामे थांबलेली असल्याचे समोर आले.
शिक्षण विभागात ९९ शाळा एकशिक्षकी होण्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर सेवानिवृत्त शिक्षक व कंत्राटी शिक्षक नेमण्याची मागणी करण्यात आली.
रस्ता अडविल्याच्या तक्रारी, हॉटेल व्यावसायिकांना एमएनजीएलकडून गॅस पुरवठ्याची मागणी, तसेच नेपाळ येथे स्पोर्ट्स डान्स स्पर्धेसाठी जाणाऱ्या विद्यार्थिनीला मदत करण्याची ग्वाही आमदार राणे यांनी दिली.
आजच्या आमसभेत एकूण १२५ निवेदने व सूचना आल्या असल्याचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी सांगितले.
प्रफुल्ल वालावलकर यांच्या ३३ वर्षांच्या सेवेनिमित्त आमदार निलेश राणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
शेवटी आमदार निलेश राणे यांनी सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. पुढे लोकांच्या हितासाठी गावोगावी ग्रामसभा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
उपस्थितांचे आभार बीडीओ प्रफुल्ल वालावलकर यांनी मानले. या आमसभेला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
