जनगणना २०२७ पूर्वतयारी; १ ते १४ मे दरम्यान ‘स्व-गणना’ची सुविधा सुरू
तहसीलदार श्रीधर पाटील यांचे आवाहन; नागरिकांनी ऑनलाईन माहिती भरून प्रक्रियेत सहभागी व्हावे
सावंतवाडी,
भारत सरकारतर्फे घरसूची व गृहगणनेची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, त्यापूर्वी नागरिकांसाठी १५ दिवसांची विशेष ‘स्व-गणना’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात १ मे ते १४ मे या कालावधीत नागरिकांना आपली माहिती ऑनलाईन पद्धतीने स्वतः भरता येणार असल्याची माहिती सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे.
या प्रक्रियेसाठी नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व १० अंकी मोबाईल क्रमांक नोंदवून ओटीपीच्या माध्यमातून लॉग-इन करायचे आहे. त्यानंतर जिल्हा, पिन कोड व गावाची माहिती निवडून गुगल मॅपवर आपल्या घराचे स्थान निश्चित करावे लागेल. पुढे पोर्टलवर विचारण्यात आलेल्या ३३ प्रश्नांची उत्तरे पर्यायांमधून निवडून माहितीची खात्री करून ‘फायनल सबमिशन’ करायचे आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ११ अंकी ‘एसई आयडी’ नागरिकांना प्राप्त होईल.
दरम्यान, जे नागरिक स्व-गणना करू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी १५ मे ते १५ जून या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष घरभेटी देऊन माहिती संकलित करणार आहेत. मात्र, प्रशासनाने स्व-गणनेचा पर्याय अधिक सोयीस्कर असल्याचे सांगितले आहे.
नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय व सुरक्षित ठेवली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ‘आमची जनगणना, आमचा विकास’ या भावनेतून सर्वांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.
