मध्यरात्रीच्या वादळाने सावंतवाडी हादरली; सुदैवाने जीवितहानी टळली
एस.पी. महाविद्यालयासह शहरात मोठे नुकसान; झाडे कोसळली, पत्रे उडाली, वीजपुरवठा खंडित
सावंतवाडी
सावंतवाडी शहराला काल मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास भीषण वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या वादळामुळे शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. झाडे कोसळणे, इमारतींची पत्रे उडणे आणि काचेच्या खिडक्या फुटणे अशा घटनांनी नागरिकांची धास्ती वाढली होती. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या नैसर्गिक आपत्तीमध्ये श्री पंचम खेमराज (एस.पी.) महाविद्यालयाचे सर्वाधिक नुकसान झाले. प्रचंड वेगाने सुटलेल्या वाऱ्यामुळे जुन्या इमारतीचे कौलारू छत पूर्णपणे विस्कळीत झाले, तर नवीन इमारतीवरील पत्रे हवेत उडून दूरवर जाऊन पडली. काही पत्रे तीन मजली इमारत ओलांडून मागील बाजूस फेकली गेली, यावरून वाऱ्याच्या तीव्रतेची कल्पना येते.
दरम्यान, शहरातील रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्र्याचे छत उडून थेट एस.पी. कॉलेज परिसरात कोसळले. तसेच इमारतीच्या काचेच्या खिडक्यांचेही नुकसान झाले आहे. नगरपरिषदेने अलीकडेच जुन्या पत्र्यांच्या शेडचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने चर्चांना उधाण आले आहे.
विद्युत पुरवठा खंडित
गुरुवारी सायंकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. आंबोली परिसरात पावसाची नोंद झाली होती. मध्यरात्री वादळ सुरू होताच खबरदारीचा उपाय म्हणून शहराचा वीजपुरवठा सुमारे दोन तास खंडित करण्यात आला, त्यामुळे शहर अंधारात बुडाले होते.
ठिकठिकाणी नुकसान
राजवाडा परिसरात नारळाचे झाड कोसळून कठड्याचे नुकसान झाले, तर शिव उद्यानातील झाडे पडल्याने सौंदर्यीकरणाला धक्का बसला. उभाबाजार भागात एका घरावरील पत्रा उडून शेजारील अंगणात पडला. आरपीडी परिसरातील जाहिरात कमानीही वाऱ्यामुळे कोसळल्या.
मोठा अनर्थ टळला
वादळ मध्यरात्रीच्या सुमारास आल्याने रस्त्यांवर वर्दळ नव्हती. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. प्राथमिक अंदाजानुसार शहरात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, प्रशासनाकडून सकाळपासून पडलेली झाडे हटविण्याचे आणि परिस्थिती पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
