मालवणमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
मेढा परिसरातील घटना; कुटुंबीयांकडून उपचारासाठी नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले
मालवण
शहरातील मेढा येथील रहिवासी सर्वेश संतोष पराडकर (वय ३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास सर्वेश पराडकर हा आपल्या मेढा येथील घरात नायलॉनच्या दोरीने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी मयताचे वडील संतोष भास्कर पराडकर (वय ५९) यांनी मालवण पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी घटनास्थळ व रुग्णालयात भेट देत पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार जे. एल. रेवंडकर करत आहेत.
