कणकवलीत पावसाची जोरदार एंट्री; शहरात ठिकठिकाणी पाणी साचले
उडानपुलाखाली कचऱ्याचा मारा, नागरिकांची तारांबळ; देखभालीअभावी प्रशासनावर टीका
कणकवली :
दोन दिवसांच्या उकाड्यानंतर आज सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास कणकवली शहरात जोरदार पावसाची एंट्री झाली. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
उडानपुलाच्या साईड पाईपमधून कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या तसेच भाजीपाला रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. विशेषतः दुचाकीस्वारांनी पावसापासून बचावासाठी पुलाखाली थांबणे पसंत केले. काही ठिकाणी पाईप फुटल्याने धबधब्यासारखे पाणी रस्त्यावर वाहताना दिसले.
या प्रकारामुळे प्रशासनाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, वेळेवर मेंटेनन्स न केल्यास पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या समस्येबाबत अजित नाडकर्णी यांनी पालकमंत्री नितेश राणे तसेच नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. यावर नगराध्यक्ष पारकर यांनी आपण सध्या मुंबईत असून लवकरच बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन दिले.
