*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*माय माती नि मायबोली..*
रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन…
——— इंदिरा संत…
“जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी”
होय, आपण मातीतूनच वर येतो व शेवटी मातीतच सामावतो हे जीवनाचे अंतिम सत्य
आहे. आपण सारे पंचमहाभूतांपासून बनलो
आहोत.
इवलेसे बीज पृथ्वीच्या पोटात पडते. माती त्याला
पांघरूण घालते. तिच्या उबदार कुशीत जोजवते.
पाण्याचे शिंपण होताच त्याला धुमारे फुटू लागतात. ते हळूच डोके वर काढते. प्रकाश, पाणी, वायु, धुके या सर्वांकडे कुतुहलाने पहात
ते वर वर आकाशाकडे झेपावते. वारा वादळाशी
झगडते. मुळे मातीत खोल घट्ट रुतत जातात. मजबूत होतात. माती त्यांना घट्ट धरून ठेवते. हलू
देत नाही, कितीही सोसाट्याचा वारा असला तरी
कोलमडू देत नाही. आणि बघता बघता त्याचा फळभाराने लगडलेला भरदार वृक्ष बनतो.ही माती,
मंडळी, किती अनमोल आहे आले ना लक्षात.अहो,
सारे काही मातीतूनच तर मिळते आपल्याला. अन्ना पासून ते खनिजांपर्यंत, भाजीपाल्या पासून
ते सोने हिरे मोत्यांपर्यंत सारे मातीच देते. आज जो झगडा चाललाय तेलाचा
ते ही मातीतूनच मिळते ना? तेच तर या भांडणाचे
मूळ आहे. मातीवर सत्ता हवी. ती माती आम्हाला
हवी.माती किती अनमोल आहे, सारे काही तिच
देते ना? मग अनमोल असणारंच ना?
ही जमीन, हा प्रदेश आम्हाला हवा. साम्राज्यवाद,
किती बोकाळलाय् जगात आम्ही बघतो आहोत.
प्रत्येक देश दुसऱ्या देशात घुसू बघतोय, आपली
जमीन वाढवण्याचा प्रयत्न करतोय.. कारण ही
माती उपजाऊ आहे. दोन शेतकरी एकमेकांचे बांध कोरून आपली जमीन वाढवू बघतात कारण ती उपजाऊ आहे. देणारी आहे, माणसाला
पोसणारी आहे. रहाण्यासाठी, घर बांधण्यासाठीही जमीनच लागते हो.म्हणून शहरात जमीनीच्या किमती आभाळाला भिडल्या
आहेत.शहरात ज्यांची उपजाऊ शेती होती ती
विकून चक्क इमारती उभ्या रहात आहेत. आपल्या अन्नदात्या जमिनीला विकून शेतकरी
करोडो रूपये कमवून चैन करत आहे.माती हे
जीवनाचे अंतिम सत्य आहे. मुठभर जमीन नसेल
तर निवारा नाही. ऊन पाऊस वाऱ्यापासून संरक्षण नाही. उघड्या फुटपाथचा आश्रय घेऊन
कोट्यावधी लोक निसर्गाशी झगडा देतात. हे आहे मातीचे महत्व. माती तारणारी आहे.
माती पोटात घेणारी आहे. ज्या मातीतून फुलझाडे
उमलतात तीच फुले मातीत पडून मातीमय होतात
व पुन्हा पुन्हा जन्म घेतात. माती देते पण नि घेते
पण. मातीत जे जे पडते ते ते माती आपल्यासारखे
करून टाकते. मग तुम्ही काहीही टाका. माती इतके महात्म्य क्वचित कुठल्या गोष्टीचे असेल.
म्हणूनच या मातीला आम्ही “माय” म्हणतो. मायमाती म्हणतो.मातृभूमी म्हणतो.मायभूमी म्हणतो. आणि या भूमीसाठी प्रसंगी लढा देतो.
तिच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढतो.
आणि आपली दुसरी माय म्हणजे आपलीच माता,
जननी जी आम्हाला जन्म देते.या आई विषयी काय काय बोलावे?
जवळपास असाच झगडा आपला आहे नाही का? आईच्या कुशीतून जन्म घेतल्यापासून आपलाही जगण्याचा असाच झगडा चालू असतो.
रोप जसे वादळवाऱ्याशी झगडत वाढते तसेच
आपणही जगण्याचा लढा लढतो. अनेक वादळे,
संकटे येतात पण आपली माय व बाप दिव्या भोवती हात धरत भले त्यांना कितीही चटके बसोत पण जीवाच्या आकांताने आपले रक्षण करतात व या जीवनाच्या लढाईत लढण्याचे बळ
देतात. भले त्यांना त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागो ते मागे हटत नाही. गाठीला गाठ
मारून शिकवतात व पायावर उभे रहायला शिकवतात. सर्व प्राण्यांची बाळे जन्मत:च पायावर उभी राहतात. फक्त माणसाचे बाळ उशिरा चालते. नीट चालायला तीन वर्षे लागतात.
जंगली प्राण्यांना तेवढी सवडच नसते. असंख्य
शत्रू बाळावर टपलेले असतात. त्यांना आई मागे
धडपडत चालावेच लागते त्याला पर्याय नसतो.
त्याही आयाच असतात, जीवापाड आपल्या पिलांना जपतात. शत्रू आला तर तुटून पडतात. आपल्या पिलाचे रक्षण करतात. प्रसंगी प्राणही देतात. सर्व सृष्टीतील प्रत्येक आई तितकीच महान आहे जितकी आपली आई. पक्षिणी घरटे
बांधतात, पिलांना जपतात, उडायला शिकवतात.
एका मांजराचे पिलू तिच्यापासून भरकटले. दूर
गेले. तिने त्याला शोधून काढले. आधी जोरात
फिसकारली, रागावली नंतर एक जोरदार पंजाची
चापट गालावर मारली व म्हणाली,” जाशील पुन्हा इकडे तिकडे?” भाषा कळत नाही पण भाव तेच होते.
अशा असतात आया. सामदामदंडभेद वापरून
लेकरांना घडवतात. संस्कार करतात व जगाच्या
लढाईत पाय रोवायला शिकवतात. गुणी बाळे
चिज करतात, काही भरकटतात, त्यात मातापित्यांचा दोष नसतो.
अशा या मायममतेच्या कुशीत पहिल्यांदा येताच
तिच्या मुखातून पहिले शब्द जे आपल्या कानावर
पडतात ती आपली मायबोली.. “माय”च्या मुखातून कानावर पडलेले पहिले शब्द मग ते
समजोत अथवा न समजोत ते गोड असतात.
हळूहळू कळू लागतात, तीच आपली मायबोली.
त्या अर्थाने माझी मायबोली” अहिराणी” आहे,
जी माझी आई व माझा परिसर माझ्याशी बोलत
होता. मी ती बोलतच लहानाची मोठी झाले. माझ्या कणाकणात ती मुरलेली आहे, इतकी की
आज पट्टीची प्रमाणभाषा बोलणारी व शिकवणारी मी माहेरचं माणूस दिसताच माझ्या
नकळत माझ्या मायबोलीत मी केव्हा बोलू लागते
ते मला कळत देखील नाही. शाळेत शिकतांना
नंतर माझी माझ्या प्रमाण मराठी मायबोलीशी
ओळख होऊन ती ही मी चांगलीच पचवली
कारण शाळेत मला तिचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळाले. आणि मग मी शिकून माझ्या विद्यार्थ्यांशी तिच्यातून संवाद साधत तिला
वाढवली. अशा या प्रमाणभाषा मराठीवर आम्ही
सारेच जीवापाड प्रेम करतो. आता तर तिला
“ अभिजात मराठीचा” दर्जा मिळाल्यामुळे आम्ही
सारेच सुखावलो आहोत. सरकारदरबारी तिची दखल घेतली गेली हा आमचा अभिमानाचा विषय
आहे.
अशा या आमच्या मराठीत संत पंत तंत ऋषीमुनी
साऱ्यांनीच लिखाण करून तिचे झेंडे समुद्रापार
गेले. आमचा तुकाराम जर्मनीत गेला. ज्ञानेश्वरी
भागवत जगभर डंका गाजवत आहे. तुकाराम
वारकऱ्यांनी पचवला आहे व त्यांच्या मुखातून
गर्जतो आहे. हे सारे वाड्.मय चिरंजीव आहे.
“आचंद्रसूर्य” ते रहाणार आहे.या माझ्या मायमराठीत किती लेखकांनी मुशाफिरी केली
आहे व करत आहेत याची गणतीच नाही. दिवसेंदिवस ती वाढत आहे, प्रसारण पावत आहे.
म्हणून आम्हाला माय माती व मायबोलीचे ऋण
चुकवताच येणार नाही इतके त्यांचे आमच्यावर
उपकार आहेत. आम्ही सारे त्यांच्या ऋणातच
राहू इच्छितो इतक्या या गोष्टी आम्हाला प्रिय
आहेत.
माय माती नि मायबोली आमच्या जीवनाचे मुलाधार आहेत, आपण सदैव त्यांच्यापुढे
नतमस्तक राहू…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
