You are currently viewing फळ पिकांच्या जी. आय. मानांकनासाठी शेतकऱ्यांना आवाहन

फळ पिकांच्या जी. आय. मानांकनासाठी शेतकऱ्यांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी

केंद्र व राज्य शासनाने कृषि माल निर्यात धोरण लागू केले असून, राज्यात जिल्हास्तरावर कृषि माल निर्यात कक्षाची स्थापना 15 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी जी.आय. मानांकनासाठी उत्फुर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषि सह संचालक यांनी केले आहे.

            राज्यात विविध भागांमध्ये उत्कृष्ट दर्जाची फळे व भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. कोकण विभागामध्ये हापूस आंब्याचे वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. फलोत्पादन विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध फळबाग लागवड योजनेमुळे संपूर्ण राज्यात व कोकणात फळबागांखालील क्षेत्र मोठ्याप्रमाणात वाढले आहे. त्यामुळे भौगोलिक चिन्हांकन  नोंदणीस विशेष महत्व प्राप्त झाले आहे. युरोपियन आणि पाश्चिमात्य देशात भौगोलिक चिन्हांकनाचा दर्जा असलेल्या पिकास व मालास ग्राहकांची जास्त पसंती असते.

            कोकाण विभागातील सिंधुदुर्ग येथील कोकम, हापूस आंबा व काजू या फळांना देशामध्ये भौगोलिक चिन्हांकनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. चालू वर्षात हापूस आंब्याला जी.आय.लेबल लावून युनायटेड किंगडम या देशामध्ये प्रथमच निर्यात करण्यात आले. त्याचा फायदा जी.आय. मानांकित शेतकऱ्यांना होत आहे. भौगोलिक चिन्हांकन प्राप्त फलोत्पादन पिक विक्री व निर्यातीसाठी या उत्पादनाचा स्थानिक व जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

            जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी या मानांकित जी.आय.पिकांचे अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणीसाठी तालुकास्तरावर कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. ही मोहिम शनिवार दि. 20 नोंव्हेंबर पर्यंत राबविण्यात येत आहे. तरी याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा