*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेचे लेखक कवी विगसा लिखित काव्याचे मा. विनय पारखी यांनी केलेलं रसग्रहण*
*अरूपा*
~~~~~~
विश्वेश्वराच्या
सुंदर पारावरती
अरूपा सांज पांघरून
बसली होती
गुलमुसलेली ती
सोनसळी व्याकुळी
भावुक बकुळगंधात
रमलेली होती
नादब्रह्मी
गीतात शब्द मांगल्याचा
तर स्पर्श अबोली
अन ओढ अनामिक होती
प्रश्न एकची अरुपाचा
वाट किती रे पाहू
प्रतीक्षेत बघ
तिन्हीसांजा झाली होती
तुझ्याविना रे दुजे
अस्तित्व ते कोणते
पैलतीरावरी तुझीच
निळसर सावली होती
*वि.ग.सातपुते. (भावकवी )*
‘विगसा’ सरांची ‘अरुपा’ ही कविता म्हणजे एका निराकार भावनेचे अत्यंत भावपूर्ण आणि अतींद्रिय चित्रण आहे. ‘अ’ आणि ‘रूप’ यांच्या संयोगातून साकारलेली ही ‘अरुपा’ म्हणजे जिचा कोणताही निश्चित आकार नाही, जी भौतिक रूपाच्या पलीकडे आहे; कदाचित ते शुद्ध चैतन्य असावे किंवा मनात खोलवर रुजलेली एखादी उत्कट भावना! कवीने या अरुपेला एका ‘प्रेयसी’चे रूप देऊन शब्दांत इतके प्रभावीपणे गुंफले आहे की, ती निराकार असूनही सगुण भासते.
योगायोगाने, कालच सद्गुरूंच्या प्रवचनात ‘अद्वैतात द्वैत शोधणे’ हा गहन विचार ऐकायला मिळाला आणि आज आप्पांच्या कवितेतून त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला. अद्वैत तत्त्वज्ञान जरी ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’ (सर्व काही एकच आहे) असे सांगत असले, तरी भक्तीचा आणि प्रेमाचा परमानंद लुटण्यासाठी भक्त स्वतःला भगवंतापासून क्षणभर वेगळे कल्पितो. ‘मी तुझाच अंश आहे, तरीही तुझ्या प्रेमासाठी मी तुझा भक्त होणे पसंत करतो’ हा भाव म्हणजे अद्वैतातील मधुर द्वैत होय. अगदी याच उक्तीप्रमाणे, आप्पांनी त्या ‘एकत्वाच्या’ चैतन्याला ‘अरुपा’ नावाच्या प्रेयसीचे रूप देऊन हा भक्तीचा आणि प्रेमाचा प्रवास मांडला असावा, असे प्रकर्षाने वाटते.
जेव्हा आपण मानवी गजबजाटापासून दूर, निसर्गाच्या निवांत कुशीत आणि दैवी चैतन्याने भारलेल्या एखाद्या पवित्र स्थानी एकांतात असतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने बाह्य जगाचा विसर पडतो. अशा शांत क्षणी, जेव्हा अंतर्मनात एक अनामिक ‘तंद्री’ लागते, तेव्हाच त्या ‘अरुपे’चा साक्षात्कार होतो. ती कोणतीही दृश्य प्रतिमा नसते, तर त्या एकांतात जाणवणारे ते एक सूक्ष्म, अमूर्त आणि तरीही अत्यंत जिवंत असे अस्तित्व असते. कवीने वर्णिलेली ही ‘अरुपा’ म्हणजे निसर्ग, ईश्वर आणि आपली भावना जिथे एकरूप होतात, त्या अद्वैताच्या क्षणाचे सुंदर प्रतिबिंब आहे.
सांजवेळेच्या गूढ आणि शांत वातावरणातून कवितेचा आरंभ करणे हा आप्पांच्या लेखणीचा जणू आवडता सोहळाच! याही कवितेत त्यांनी संध्याकाळच्या त्या संधिप्रकाशाचा वापर अतिशय खुबीने केला आहे. ‘विश्वेश्वराच्या पारावर’ या शब्दांतून कवी केवळ एका ठिकाणाचे नाव घेत नाही, तर एका पवित्र आध्यात्मिक ऊर्जेचे अधिष्ठान उभे करतो. इथे ‘विश्वेश्वराचा पार हे कवीने श्रद्धेचे प्रतीक मानले आहे. अशा त्या पावन ठिकाणी ही ‘अरुपा’ शांतचित्त बसलेली आहे, हे मोजक्या पण गर्भित शब्दांतील वर्णन वाचकाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. अथांग शांतता आणि सांजवेळेची व्याकुळता जिथे एकत्र येते, तिथेच त्या निराकार ‘अरुपे’चे अस्तित्व अधिक गडदपणे जाणवू लागते.
अशा त्या सोनेरी सांजवेळच्या संधिप्रकाशात, व्याकुळ झालेली ‘अरुपा’ वातावरणात दरवळणाऱ्या बकुळीच्या फुलांच्या मादक सुगंधात जणू स्वतःला हरवून बसली आहे. आप्पांचे आणि बकुळीच्या फुलांचे एक अतूट आणि भावबंधांचे नाते आहे; आणि म्हणूनच की काय, या एकांतसमयी कवीच्या मनात दडलेले हे नाते ‘अरुपा’च्या रूपाने उफाळून वर येत असावे असे वाटते. त्या अरुपेच्या अंतरंगात एक सुरावली (नाद) आहे, तिच्या मौनातही मांगल्य आहे; परंतु तिची ओढ मात्र अनामिक आणि अबोल आहे. जरी ती चर्मचक्षूंना अदृश्य असली, तरी कवीला मात्र तिच्या अस्तित्वाचा सुगंध आणि स्पर्श पावलोपावलो आपल्या मनाच्या गाभाऱ्यात जाणवत आहे.
कवीच्या अंतर्यामी दरवळणाऱ्या त्या अस्तित्वाच्या सुगंधाला ती ‘अरुपा’ जणू आर्ततेने विचारते आहे- ‘आता सांज सरून तिन्हीसांजा होऊ घातल्या आहेत, तरीही तुझी प्रतीक्षा संपत का नाही? मी अजून तुझी किती वाट पाहू?’ विशेष म्हणजे, हा प्रश्नही तिचाच आहे आणि त्याचे अलौकिक उत्तरही तीच देते. ती म्हणते, ‘अरे, मी आणि तू वेगळे उरलोच नाही आहोत. आपले अस्तित्व आता एकरूप झाले आहे. पलीकडच्या तीरावर जी निळसर सावली दिसते आहे, ती दुसरं तिसरं कुणी नसून तुझंच प्रतिबिंब आहे!’
नेहमीप्रमाणेच, आप्पांनी येथे ‘निळसर सावली’ या प्रतीकाद्वारे त्या कृष्णवर्णीय, ईश्वरी चैतन्याचे अतिशय खुबीने दर्शन घडवले आहे. या कवितेत करुण आणि भक्ती रसाचा जो उत्कट परिपोष झाला आहे, तो वाचकाच्या हृदयाचा ठाव घेतो. वाट पाहण्यातील ती व्याकुळता कवीने अत्यंत तरल आणि मृदू शब्दांतून मांडली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा उत्कट भावना दुसऱ्याच्या अस्तित्वात पूर्णपणे विरघळून जाते, तेव्हा तिचे स्वतंत्र ‘मी-पण’ उरत नाही. ती मग केवळ एका सावलीप्रमाणे किंवा बकुळीच्या सुगंधाप्रमाणे समोरच्याच्या मनाचा संपूर्ण गाभारा व्यापून उरते, हाच या कवितेचा परमोच्च बिंदू आहे.
*(c) विनय पारखी*
आप्पा ज्या दिवशी सद्गुरूंच्या प्रवचनात जो विषय येतो त्याचेच जणू उत्तर दुसऱ्या दिवशी आपल्या कवितेतून आपण मांडलेले असते. हा असा योगायोग बर्याच वेळा आला आहे म्हणून तो संदर्भ ताजा असतो म्हणून चटकन विचार करून रसग्रहण करता येतं. खरंच हे काही तरी गुढ अकलनीय आहे.
तुम्ही म्हणता तेच खरे आहे.
*इदं न मम.*
शेवटी आपली कविता सुद्धा हेच सांगते. जेव्हा जीथे अहंकाराचा विलय होतो तीथेच अर्पण केलेल्या बकुळीच्या सुगंधाप्रमाणे सर्वच गोष्टी त्या निळसर सावलीच्या ईश्वरी तत्वात विलीन होतात.
