३३१ वर्षांची परंपरा जपत शिवराजेश्वर मंदिरात जल्लोषात शिवजन्मोत्सव
सुधीर थोरात, सयाजी सकपाळ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती; रील्स स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
मालवण :
जय भवानी… जय शिवाजी… अशा घोषणांनी आणि ढोल-ताशांच्या गजरात मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिरात पारंपरिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराची राजधानी असलेल्या आणि जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यात इ.स. १६९५ पासून छत्रपती राजाराम महाराजांनी सुरू केलेली शिवजन्मोत्सवाची परंपरा आजतागायत अखंडपणे ३३१ वर्षे जोपासली जात आहे. या परंपरेनुसार मालवणातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने एकत्र येत शिवजयंती साजरी करतात. प्रारंभी स्वराज्य ढोल पथकाद्वारे ढोल-ताशा वादन करण्यात आले, त्यानंतर मर्दानी खेळ सादर करण्यात आला.
कार्यक्रमात व्यासपीठावर शिवशंभू विचारमंचचे महाराष्ट्र संयोजक सुधीर थोरात, कार्यक्रमाध्यक्ष व शिवराजेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी सकपाळ, वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान लुडबे, मंदिराचे सेवेकरी श्रीराम सकपाळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा संघचालक अरविंद कुडतरकर, जिल्हा कार्यवाह विनय धावले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. पवन बांदेकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी सुधीर थोरात यांनी शिवचरित्र व सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी व्याख्यान देताना, परकीय आक्रमणांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले, असे सांगितले. तसेच शिवरायांनी उभारलेले किल्ले हे केवळ पर्यटन स्थळ नसून तीर्थक्षेत्र असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात सयाजी सकपाळ व श्रीराम सकपाळ यांनी मंदिरातील विविध उपक्रमांची माहिती दिली. जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील प्रतिनिधी, नगरसेवक रवीकिरण तोरसकर, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, ललित चव्हाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. रील्स स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत प्रथम संकते हसोळकर, द्वितीय स्वानंद सामंत, तृतीय हनु हडकर (मालवणी माणूस), उत्तेजनार्थ निलेश सावंत (सावंतांचा सर्किट) व साळगावची आडसारा यांनी यश मिळवले. तसेच कोकणचा सिध्दार सोहम गावकर (सोलो मास्टर) व सोहम एडिट्स यांना सहभाग पारितोषिक देण्यात आले.
या उत्सवात भूषण साटम, भाऊ सामंत, शिल्पा खोत, रत्नाकर कोळंबकर, राजू सावंत, भूषण मेस्तर, ज्योती तोरसकर, शिल्पा गाड, अमृता फाटक, प्रविण शिंदे, अमिता न्हिवेकर, श्रीराज बांदेकर, सुशांत तायशेटे, प्रविण पवार, अॅड. हेमेंद्र गोवेकर, दिलीप वायंगणकर, चेतन आजगांवकर, योगेश वांगा, अमित नाईक, अमित भगत, मोरेश्वर गोसावी, राजेश वळंजू, राजन कामत, हितेश वायंगणकर, गणेश कोळगे, साईप्रसाद वालावलकर, गणेश केळुसकर, कमलेश चव्हाण, सुनील धुरी, रुपेश सुर्वे, सचिन सुतार, महेश कानिटकर, सौरभ नागोळकर, शैलेश वारंग, मंदार बागलकर, विष्णू निगुडकर, अरुण गव्हाणकर, शैलेश खाडिलकर, गुरुप्रसाद कामत यांसह अनेक मान्यवर, किल्ला रहिवासी, शिवप्रेमी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजन्माच्या मुहूर्तावर शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सिंधुदुर्गतर्फे घोषवाक्यांद्वारे मानवंदना देण्यात आली. शिवआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या उत्सवासाठी किल्ला प्रवासी वाहतूक संघटना, शिवराजेश्वर होडी संघटना, शिवशक्ती होडी संघटना व दांडेघर दांडी होडी संघटनांनी मोफत होडी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून सहकार्य केले.
