You are currently viewing संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना ‘युडीआयडी’ ई-केवायसी करणे अनिवार्य…

संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना ‘युडीआयडी’ ई-केवायसी करणे अनिवार्य…

संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना ‘युडीआयडी’ ई-केवायसी करणे अनिवार्य…

मालवण

केंद्र आणि राज्य शासनाच्या सामाजिक विशेष सहाय्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध पेन्शन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना (दिव्यांग) अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी आपले युडीआयडी कार्ड (दिव्यांग प्रमाणपत्र) आधार कार्डशी लिंक करणे आता अनिवार्य झाले आहे. तहसीलदार गणेश लव्हे यांनी यासंदर्भात पत्रक काढून लाभार्थ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या आदेशानुसार, दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांच्या वैश्विक ओळखपत्राची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २५ एप्रिल २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. विहित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास लाभ मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.
लाभार्थी खालीलपैकी कोणत्याही मार्गाने आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यात
लाभार्थ्यांनी स्वतः https://swavlambancard.gov.in या वेबसाइटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी, आपल्या गावातील किंवा शहरातील महा ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन ही लिंक करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
शासनाच्या वतीने श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ/विधवा/दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा विविध योजनांतर्गत समाजातील उपेक्षित व निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, दिव्यांग कल्याण विभागाच्या नवीन निर्णयानुसार, आता दिव्यांग लाभार्थ्यांकडे युडीआयडी कार्ड असणे आणि ते आधारशी संलग्न असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शासकीय योजनांचा लाभ विनाव्यत्यय सुरू राहण्यासाठी मालवण तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ एप्रिल पूर्वी आपले युडीआयडी कार्ड आधारशी लिंक करून घ्यावे. असे आवाहन तहसीलदार गणेश लव्हे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा