You are currently viewing चापेकरबंधू म्हणजे तीन क्रांतिफुले! – डाॅ. नीता मोहिते

चापेकरबंधू म्हणजे तीन क्रांतिफुले! – डाॅ. नीता मोहिते

चापेकरबंधू म्हणजे तीन क्रांतिफुले! – डाॅ. नीता मोहिते

पिंपरी

‘१८५७ पासून पुढे ७५ वर्षे अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानाने ही भारत भू पवित्र झालेली आहे. त्यातील तीन क्रांतिफुले म्हणजे चापेकर बंधू आहेत!’ असे प्रतिपादन डाॅ. नीता मोहिते यांनी कॅप्टन कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी प्राधिकरण येथे केले. ब्रिटिश अधिकारी जुलमी रॅंडला यमसदनाला पाठविणार्‍या क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या १८ एप्रिल या स्मृतिदिनानिमित्त आगामी काळात क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या चापेकर व्याख्यानमालेतील ‘क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या शौर्याचे स्मरण’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना डॉ. नीता मोहिते बोलत होत्या. ज्येष्ठ शास्त्रज्ञ व क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष डाॅ. अशोक नगरकर अध्यक्षस्थानी होते; तसेच उपमहापौर शर्मिला बाबर, डाॅ. शंकुतला बन्सल, शाहीर आसराम कसबे, सामाजिक कार्यकर्ते नाना कांबळे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. नीता मोहिते यांनी १८५७ ला क्रांतीची जी पहिली ठिणगी पडली त्या घटनेपासून ते क्रांतिवीर चापेकरांना ब्रिटिश सरकारने दिलेल्या फाशीच्या घटनेपर्यंतचा इतिहास सविस्तरपणे उलगडून सांगितला. क्रांतिवीर चापेकर बंधूंनी वेगवेगळ्या गुप्त पद्धतीने ब्रिटिश सरकारला कसे जेरीस आणले हे सांगताना पुण्यातील हत्यारे मिळविणे, मुंबईतील व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यास डांबर फासणे, हिंदूधर्मविरोधी कार्य करणार्‍या लोकांना साम, दाम, दंड, भेद या मार्गांनी धडा शिकविणे, प्लेगच्या साथीत मॅट्रिक परीक्षा सक्तीची केल्यावर ब्रिटिशांनी टाकलेला परीक्षा मंडपच पेटवून देणे असे अनेक प्रसंग सांगितले. क्रांतिवीर चापेकर बंधू व त्यांचे सहकारी यांचे देशभक्तिविषयक असीम प्रेम, तपशिलासह अचूक नियोजन आणि त्यानुसार गुप्तपणे केलेली कार्यवाही या बाबी तरुण पिढीला समजल्या पाहिजेत, अशी अपेक्षा डाॅ.नीता मोहिते यांनी व्यक्त केली. शर्मिला बाबर यांनी, ‘आपली पिंपरी – चिंचवडची भूमी क्रांतिवीर चापेकरांच्या बलिदानाने ऐतिहासिक ठरली असून हा प्रेरणादायी इतिहास व्याख्यानमालांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वत्र पोहचला पाहिजे!’ अशा शब्दांतून शुभेच्छा दिल्या. डाॅ. अशोक नगरकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘क्रांतिकारकांच्या सशस्त्र लढ्याने स्वातंत्र्य मिळवलेला भारत देश आता सकारात्मक दिशेने बदलत असून संरक्षण क्षेत्रात प्रगती करत आहे, ही समाधानाची बाब असली तरी दहशतवादी कारवाया समूळ नष्ट करणे हे जगातील मोठे आव्हान आहे!’ असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता घोडे यांनी केले. शुभदा कानडे, योगेश्वरी महाजन, प्रज्ञा फुलपगार यांच्या चापेकरस्तवन गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे व्यवस्थापक अतुल आडे, समर्थ डोंगरे, सागर शेवाळे आणि किरण गायकवाड यांनी परिश्रम घेतले. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. आसराम कसबे यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा