You are currently viewing जिल्हा नियोजन मधून ४४ कोटी दिल्यास सर्व ग्राहकांना वीज माफी – परशुराम उपरकर

जिल्हा नियोजन मधून ४४ कोटी दिल्यास सर्व ग्राहकांना वीज माफी – परशुराम उपरकर

पालकमंत्र्यांनी जिल्हावासियांची दिशाभूल थांबवावी…

कणकवली

थकित वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे पालक मंत्री उदय सामंत हे थकीत वीज ग्राहकांची वीज तोडणी थांबवू शकत नाही. त्यांनी फुकाची आश्वासने देऊन सिंधुदुर्ग वासियांची दिशाभूल करू नये. इथल्या वीजग्राहकांना दिलासा द्यायचाच असेल तर त्यांनी जिल्हा नियोजन मधून ४४ कोटी रुपयांची रक्कम थकीत वीजबिल साठी वळती करावी असे आवाहन मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज केले.
येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या सोबत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. श्री उपरकर म्हणाले केंद्रातील भाजप आणि राज्यातील शिवसेना सरकार जनतेची धूळफेक करण्याचे काम करत आहे. शिवसेना पेट्रोल दरवाढीविरोधात मोर्चा काढत आहे. तर भाजप वाढीव वीज दरवाढ विरोधात आंदोलन करत आहे. पण जनतेला दिलासा देण्यासाठी दोन्ही सरकार कोणतीही कामे करत नाहीत. केवळ पोकळ आश्वासने देत आहेत. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्याने आपापले टॅक्स कमी करण्याची गरज आहे. पण तशी मानसिकता या दोन्ही सरकारची नाही.
ते म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाने थकित वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याबाबत चा निर्णय घेतला आहे. या विरोधात एक कॅबिनेट मंत्री कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी थकीत वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडु नयेत असे आदेश दिले आहेत. या आदेशाला काहीही अर्थ नाही. पालकमंत्र्यांना जर दिलासा द्यायचाच असेल तर त्यांनी थकित वीज बिलापोटी ४४ कोटींची रक्कम जिल्हा नियोजन मधून द्यावे असेही श्री उपरकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 10 =