फोंडाघाटमध्ये मोठी चोरी;
4 डंपर आणि 1 JCB मधील बॅटऱ्या लंपास
फोंडाघाट (ता. कणकवली) –
फोंडाघाट परिसरात चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून, स्थानिक व्यावसायिक संजय आग्रे यांच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांमधून बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रे यांच्या कार्यालयासमोर चार डंपर आणि एक JCB उभी करण्यात आली होती. रविवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी या सर्व वाहनांमधील एकूण चार बॅटऱ्या लंपास केल्या. सकाळी कार्यालय उघडताना ही बाब लक्षात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
दरम्यान, याआधीही याच ठिकाणी वाहनांचे टायर चोरीला गेले होते. त्यामुळे फोंडाघाट परिसरात वाहनचोरीचे सत्र सुरू झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
