You are currently viewing सुरक्षा अनामत रक्कमेच्या नावाखाली वीज ग्राहकांच्या खिशावर डल्ला – माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर 

सुरक्षा अनामत रक्कमेच्या नावाखाली वीज ग्राहकांच्या खिशावर डल्ला – माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर 

ग्राहकांकडून सुरक्षा अनामत रक्कम वसुली करू नये ; अन्यथा आंदोलनाचा इशारा

मालवण :

मागील दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यात भर म्हणून वीज वितरण कंपनीने वीजेचे दर वाढवून ठेवल्याने वाढीव वीज बिले भरताना ग्राहकांची दमछाक होत असून आता अनामत रक्कमेच्या नावाखाली जनतेच्या खिशात हात घालण्याचे षडयंत्र वीज वितरण कंपनीच्या आडून महाराष्ट्र शासनाने आखले आहे. सदरील अनामत रक्कम एकही वीज ग्राहक भरणार नाही. सदरचा निर्णय मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी मालवण शहर भाजपच्या वतीने माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी सोमवारी केली. ग्राहकांकडून जबरदस्तीने अनामत रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी भाजपच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

मालवण शहर भाजपच्या शिष्टमंडळाने वीज वितरणचे सहायक अभियंता श्री. साखरे यांची भेट घेऊन अनामत रक्कम वसूल न करण्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, अभय कदम, युवक अध्यक्ष ललित चव्हाण, मोहन वराडकर, आबा हडकर, विजय चव्हाण, सुबोध गावकर, बंटी कांबळी, विलास मुणगेकर, पंकज पेडणेकर, वसंत गावकर यांच्यासह अन्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र विद्युत महामंडळाने विद्युत ग्राहकांना वार्षिक विद्युत वापरा अनुसरुन विद्युत सुरक्षा अनामत ठेवेचे अलिखित बिल अदा केले आहे. असे बिल ग्राहकांना अदा करणे चुकीचे आहे. संबंधीत विद्युत ग्राहक विद्युत कनेक्शन घेताना आपल्या कार्यालयात आवश्यक विद्युत पुरवठ्याचा टेस्ट रिपोर्ट देऊन त्या अनुसरुन अनामत रक्कम भरुन विद्युत कनेक्शन घेत असतो. असे असताना वार्षिक विद्युत वापरास अनुसरुन नव्याने अनामत ठेव भरुन घेणे हे अन्यायकारक आहे. अशी अनामत रक्कम भरण्यास विद्युत ग्राहकाला जबरदस्ती केल्यास भारतीय जनता पार्टीला जनतेची होणारी आर्थिक लुबाडणीबाबत आंदोलन करावे लागेल याची दखल आपल्या कार्यालयातून घेण्यात यावी. जनता कोरोनाच्या महामारीत आर्थिक अडचणीतून मार्गस्थ होत आहे असा अनामत रक्कमेचा आर्थिक भार ग्राहकांवर लादू नये, अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा