You are currently viewing भाजप-शिवसेनेकडून जिल्ह्यातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न – परशुराम उपरकर

भाजप-शिवसेनेकडून जिल्ह्यातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न – परशुराम उपरकर

पुतळा जाळणार्‍यांना जनतेनेच रोखावे…

कणकवली

बॅ.नाथ पै, मधु दंडवते यांचा वारसा लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शांतता तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान भाजप आणि शिवसेनेची मंडळी करत आहेत. राजकीय कुरघोडींच्या या वणव्याचा फटका शेवटी सर्वसामान्य जनतेलाच बसणार आहे. त्यामुळे आता जनतेनेच पुढे येऊन पुतळे जाळणार्‍या नेत्या-पदाधिकार्‍यांना रोखणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केले.
येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते.
श्री.उपरकर म्हणाले, सध्या भाजप आणि शिवसेनेची मंडळी कुरघोडी करण्यासाठी एकमेकांच्या नेत्यांचे पुतळे जाळत आहेत. यातून तणाव आणि दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. याखेरीज एकमेकांना समोरासमोर येण्याची भाषा केली जात असल्याने जिल्ह्यातील शांतता आणि कायदा व्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच जिल्ह्यात अशांतता निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्यातील हे सत्ताधारी पक्ष करत आहेत.
श्री.उपरकर म्हणाले, जनतेने विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत. मात्र हेच लोकप्रतिनिधी पुतळे जाण्यासाठी पुढाकार घेत आहेत हे जिल्हावासीयांचे दुदैव आहे. मतदारांनाही आपण चुकीच्या उमेदवारांना निवडून दिले याची आता जाणीव होऊ लागली आहे. याखेरीज एक माजी खासदार अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे. जाहीरपणे फटकावण्याची भाषा बोलत होते. एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधींच्या कौटुंबिक बाबीं देखील जाहीरपणे मांडत आहे. हे चुकीचे आहे. त्यामुळे आता जनतेनेच पुतळे जाळणार्‍या लोकप्रतिनिधींना, कार्यकर्त्यांना वेसण घालण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − ten =