तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे शिवसेनेची ताकद वाढली
रुपेश राऊळ यांच्या उमेदवारीने थेट लढतीला सुरुवात
सावंतवाडी
तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने अखेर आपला अधिकृत उमेदवार जाहीर करत निवडणूक रणधुमाळीला वेग दिला आहे. पक्षाचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवार जाहीर झाल्याने गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
रुपेश राऊळ यांच्या मैदानात उतरण्यामुळे तळवडे मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली असून, भाजपचे उमेदवार संदीप गावडे यांच्यासमोर ठाकरे शिवसेनेचे कडवे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता चुरशीची थेट लढत पाहायला मिळणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना रुपेश राऊळ म्हणाले, “सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढवत आहोत. महाविकास आघाडीला बळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. माझ्यासोबत पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि विश्वासू मतदार असून, जनता नक्कीच निष्ठेचे फळ देईल.”
यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, दिनेश सावंत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी जाहीर होताच ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या काही दिवसांत प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
