नवनिर्वाचित नगरसेविका दिपाली भालेकर यांचा परीट समाजाकडून भव्य सत्कार
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका दिपाली भालेकर यांचा सावंतवाडी तालुका परीट समाजाच्या वतीने भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत समाजाचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर तसेच महिला तालुकाध्यक्ष देवयानी मडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिपाली भालेकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला. तसेच समाजातील महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत विविध क्षेत्रांत नेतृत्व करावे, असे आवाहन करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना दिपाली भालेकर यांनी, समाजबांधवांनी दिलेला हा सन्मान आपल्या कार्याची पोचपावती असून भविष्यात शहराच्या सर्वांगीण विकासासह समाजहितासाठी प्रामाणिकपणे काम करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
