You are currently viewing अन्यायाची चीड अशीच कृतीतून उमटू द्या, कायदेशीर सहकार्य सदैव राहील – ॲड.संग्राम देसाई

अन्यायाची चीड अशीच कृतीतून उमटू द्या, कायदेशीर सहकार्य सदैव राहील – ॲड.संग्राम देसाई

महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या कार्यालयाचा सिंधुदुर्गनगरीत शानदार उद्घाटन सोहळा

आज महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे गोविंद सुपर मार्केटमधील कार्यालयाचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात असून १९६२ मधील भारत चीन युद्धापासून ते त्यापुढील भारत पाकिस्तान युद्धासह १९७१ च्या भारत-बांगला देश युद्धात देशासाठी प्रत्यक्ष उद्धमैदान गाजवलेल्या आणि उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एकूण ९ शौर्यपदके मिळवलेल्या हवालदार तुकाराम मेस्त्री या ज्येष्ठ भारतीय सैनिकाच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय जनतेचे लोकाधिकार टिकवण्यासाठी सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांचे योगदान तरुण पिढीने विसरता कामा नये यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे ॲड.प्रसाद करंदीकर यांनी स्पष्ट केले. गोवा आणि महाराष्ट्र बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. संग्राम देसाई यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अन्यायाविरोधात पेटून उठणाऱ्या समितीच्या कार्यकर्त्यांचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. भविष्यात संघटनेच्या कामाला भक्कम पाठिंबा आणि कायदेशीर सहकार्य समाज म्हणून उभे करू, असे ॲड. संग्राम देसाई म्हणाले.

गेली १७ वर्षे महाराष्ट्र कर्जदार जामिनदार हक्क बचाव संघर्ष समिती रस्त्यावर उतरून जनतेसाठी संघर्ष करत आहे. सद्यस्थितीत कर्जाचे प्रश्न तर गंभीर आहेतच, परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवावर्गाची बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, रस्ते या सगळ्या क्षेत्रातील अडचणी व भ्रष्टाचार ही देखील मोठी समस्या बनली आहे. त्यादृष्टीने सर्वव्यापी काम उभे करण्यासाठी संघर्ष समितीचे काम “महाराष्ट्र लोकाधिकार समिती” च्या माध्यमातून अधिक व्यापक करण्याचा निर्धार संघटनेचे संस्थापक ॲड. आप्पासाहेब घोरपडे यांनी केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या संघटनेचे काम आता महाराष्ट्र लोकाधिकार समिती म्हणून चालणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रसाद करंदीकर यांनी बोलताना सांगितले.

ओरोस येथील कार्यालय हे जिल्ह्यासाठी मध्यवर्ती असून लोकांच्या समस्या निवारणाचेही ते केंद्रबिंदु ठरेल असा विश्वास अनेक उपस्थित वक्त्यांनी बोलून दाखवला. जनतेने आपल्या समस्या या कार्यालयाकडे द्याव्यात, त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच राहील, असे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच अन्य विभागातील कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत अध्यक्ष ॲड.प्रसाद करंदीकर यांच्यासह कमलेश चव्हाण, सादिक डोंगरकर, दीपक कुडाळकर, अविनाश पराडकर, विवेक मसुरकर, राजेश साळगावकर, रत्नाकर जोशी, रौनक पटेल, संजू धावडे, विनायक मेस्त्री, सुभाष मर्ये, सचिन पडवळ, जलाल डोंगरकर, किशोर दाभोलकर, संजय सावंत, सौ माधवी मिठबावकर, सौ. सरिता गुरव, सौ. चारुलता चव्हाण, सौ वैदेही माळकर यांच्यासह मधुकर मोरे, संतोष पोळ (ठाणे), इरफान कादरी (पुणे), स्नेहल साळवी (रत्नागिरी), श्रीकांत दंडवते (नरसिंगपूर), बापूसाहेब कुलकर्णी (लातूर), धनाजी सुरवसे (ठाणे), विवेक कुंभोजकर (सोलापूर) आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =