You are currently viewing महापुरा पाठोपाठ शिरोळला पंचगंगा प्रदूषणाचा विळखा रोज हजारो मृत माशांचा खच

महापुरा पाठोपाठ शिरोळला पंचगंगा प्रदूषणाचा विळखा रोज हजारो मृत माशांचा खच

वृत्तसंस्था:

प्रत्येक महापुरात गुरफटणाऱया शिरोळ तालुक्याला पुन्हा एकदा पंचगंगा नदीप्रदूषणाने विळखा घातला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सध्या गटारगंगा बनलेल्या या नदीचे पाणी प्रचंड दूषित आणि दुर्गंधीयुक्त झाल्याने दिवसेंदिवस मृत माशांचा खच पडत आहे.

हा खच काढताना सफाई कर्मचाऱयांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच आता मृत मासे फस्त करण्यासाठी मगरींचा वावर वाढू लागल्याने धोका अधिकच वाढला आहे.

गेल्या महिनाभरापासून इचलकरंजीच्या पुढे शिरोळ तालुक्यात जाणाऱया पंचगंगा नदीचे पाणी अत्यंत दूषित झाल्याचे पाहावयास मिळत आहे. कारखान्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे दूषित पाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट नदीत मिसळत असल्याने नदीचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत आहे.

अगदी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या येथील अधिकाऱयांना पाहणी करताना बांधून ठेवण्याचाही प्रयत्न झाला, तरीसुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कागदी घोडे नाचविण्याशिवाय ठोस उपाययोजना केल्या नाहीत. प्रदूषणास कारणीभूत असलेल्या घटकांवर अजूनपर्यंत कसलीही कारवाई केल्याचे समोर आलेले नाही.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून शिरोळ बंधाऱयात मृत माशांचा अक्षरशः खच पाहायला मिळत आहे. मासे मरण्याच्या प्रमाणात आता दुपटीने वाढ झाली असून, पाणीपुरवठा विभागामार्फत मृत मासे बाहेर काढले जात आहेत. मात्र, या कर्मचाऱयांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे सफाई कर्मचाऱयांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मृत मासे खाण्यासाठी मगरींचा वावर.

धक्कादायक बाब म्हणजे, हेच मृत मासे खाण्यासाठी नदीत मगरींचा वावर वाढल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिरोळ येथील धरणाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूच्या पात्रात मगरींचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे आसपासच्या शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी आणि नागरिकांच्या जीविताससुद्धा धोका वाढला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − three =