You are currently viewing प्रतिभाशाली खासदारांची परंपरा……

प्रतिभाशाली खासदारांची परंपरा……

कोकणच्या भूमीत विद्यमान खासदारांचा अपमान योग्य आहे का?

संपादकीय…..

राजापूर मतदारसंघ आजपर्यंत ओळखला गेला तो देशाच्या राजकारणात आपल्या खासदारकीचा ठसा उमटविणाऱ्या महान खासदारांमुळेच. बॅरिस्टर नाथ पै, प्रा.मधु दंडवते पासून सुरेश प्रभूंसारख्या खासदारांनी राजापूर मतदारसंघाचीच नव्हे तर कोकणची मान देशाच्या संसदेत मानाने उंचावत ठेवली आहे. बॅरिस्टर नाथ पै यांनी १९५७ ते १९७१ पर्यंत मतदारसंघाचे नेतृत्व केले. कोकण रेल्वेचे शिल्पकार मधू दंडवते ज्यांनी १९७१ ते १९९० पर्यंत नेतृत्व करूनही स्वतःच्या नावे एक गुंठा जमीन देखील घेतली नाही उलट आपल्या मतदारसंघात सुधारणांसाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि आजही मधू दंडवतेंचे नाव कोकणवासीय आदराने घेतात.
शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू केलेले व सध्या भाजपाचे राज्यसभेवर खासदार असलेले अर्थतज्ञ सुरेश प्रभू देखील आपल्या शांत,संयमी आणि विनयशील स्वभावामुळे, कसलाही गाजावाजा न करता आपल्या मतदारसंघातील सुधारणांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून जिल्हावासीयांना परिचित आहेत. खासदारकीच्या काळात देश पातळीवर काम करताना मतदारसंघात जनसंपर्क कमी पडला परंतु वरिष्ठ पातळीवर अतिशय महत्त्वाच्या पदांवर काम करत त्यांनी देश पातळीवर कोकणला बहुमान प्राप्त करून दिला आहे. साधी राहणी उच्च विचारसरणी हे गुण अंगीकारत आजपर्यंत राजापूर मतदारसंघाची गौरवशाली परंपरा जपली गेली आहे.
कर्नल सुधीर सावंत असो वा खासदार विनायक राऊत यांनी कधीही जहाल भाषा वापरत मतदारसंघातील शांती बिघडविली नाही. त्यामुळे कोणत्याही विद्यमान आमदार, खासदार अथवा मंत्र्यांचे पुतळे जाळणे, चपलांचा हार घालणे असे प्रकार मतदारसंघात घडले नाहीत. परंतु विद्यमान खासदारांना माजी खासदारांकडून दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदारांचा पुतळा जाळून निषेध करत त्यांना अटक करावी अशा प्रकारची मागणी शिवसेनेने करताच, विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा सावंतवाडीत चपलांचा हार घालून, महिला नेत्यांकडून चपलांनी मारून जाळण्यात आल्याचा निंदनीय प्रकार बॅरिस्टर नाथ पै सारखे दिग्गज होऊन गेलेल्या जिल्ह्यात झाला यासारखी लाजिरवाणी घटना आजपर्यंत जिल्ह्यात घडली नाही.
जिल्ह्यात यापूर्वी देखील भाजप पक्ष आपली स्वतःची एक छबी जपून, देवगड,बांदा, दोडामार्ग सारख्या भागात वाढत होता. भाजपाचे कार्यकर्ते सुसंस्कृत, सुशिक्षित आहेत. जिल्ह्यात पालकमंत्र्यांची तिरडी यात्रा काढणार सारखी वक्तव्ये करून जिल्ह्याची शांतता विनाकारण बिघडविली जातेय का? राजकीय कार्यकर्ते, नेते आपली राजकीय पोळी भाजून नामानिराळे होतात परंतु तळागाळातील कार्यकर्ते मात्र निष्कारणी आपापसात वाद उत्पन्न करून एकमेकांचे दुश्मन बनतात. शांतताप्रिय सुसंस्कृत सिंधुदुर्गात गालबोट लागू नये, अशी अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − ten =