You are currently viewing छत्रपतींनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर वाढते कचऱ्याचे साम्राज्य

छत्रपतींनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर वाढते कचऱ्याचे साम्राज्य

मालवण समुद्रकिनाराही अस्वच्छतेच्या विळख्यात

विशेष संपादकीय…..

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे. इतिहास काळातही स्वच्छतेबाबत महाराज जागरूक होते, परंतु महाराजांचे मावळे म्हणवून घेणारे, छत्रपतींचा आदर्श घेऊन चालणारे, छत्रपतींच्या नावाने राजकारण करणारे छत्रपतींनी बांधलेल्या गडाच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. जलदूर्गावर मोठ्या प्रमाणात पाण्याच्या रिकामी बाटल्या, प्लास्टिक पिशव्या असा नानाविविध प्रकारचा कचरा जिकडे तिकडे पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे महाराजांनी घालून दिलेला स्वच्छतेचा आदर्श आपण पाळतो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जलदुर्गावरील कचऱ्याची साफसफाई होत नसतानाच आपल्या महाराजांचा अभिमान म्हणून सिंधुदुर्ग किल्ल्यावर भेट देणाऱ्या पर्यटकांना देखील गडावर कचरा करताना शरम का वाटत नाही? हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. गडावर प्रवेशासाठी १०/- रुपये रीतसर पावती देऊन प्रत्येक पर्यटकांकडून वसूल केले जातात. परंतु गडाची स्वच्छता न करता पैसे वसुली करणार्यांना त्याचे काहीच वाटत नाही का? बरं प्रत्येक पर्यटकांच्या मागे हे वसूल केलेले १०/- रुपये जातात कुठे? त्या पैशातून गडाच्या डागडुजीसाठी वापर होतो किंवा त्या पैशांचे काय करतात याचा लेखाजोखा ठेवला जातो का?
काहीच दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी गडावर भेट दिली होती. त्यावेळी देखील गडावर अस्वच्छताच पहावयास मिळाली होती. केवळ मोठेपणा मिरवण्यासाठी छत्रपतींसारख्या दाढ्या वाढवून मोठं होता येत नाही तर छत्रपतींनी बांधलेल्या, जतन केलेल्या गडकोट, जलदुर्गांचे जतन आणि जपणूक केली तरच छत्रपतींचे मावळे म्हणण्याचा अधिकार शिल्लक राहतो. केंद्रीय पुरातत्व खात्याकडे जवळपास ४६ आणि राज्य पुरातत्व खात्याकडे ३६ किल्ल्यांची जबाबदारी आहे, परंतु किल्ल्याचा विकासासाठी, संवर्धनासाठी, स्वच्छतेसाठी मात्र पुरातत्व खात्याकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत, त्यामुळे गडावर अस्वच्छता पसरलेली आहे.
मालवण येथे काही दुकानांमध्ये परप्रांतीय लोक कामाला आहेत. मालवणात। समुद्रकिनाऱ्याच्या आजूबाजूला राहणारे असे परप्रांतीय लोक सकाळी, पहाटे आणि रात्रीच्या वेळेस मालवण समुद्रकिनाऱ्यावर शौचास बसतात, त्यामुळे मालवणचे सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना समुद्र किनाऱ्यावर येणारी दुर्गंधी, आणि अस्वच्छता यामुळे नाहक त्या घाणीचा त्रास होतो, आणि मालवणची देखील बदनामी होते. मालवण समुद्र किनाऱ्या लगत राहणारे जबाबदार नागरिक श्री विश्वास बळवंत पालव यांनी देखील मालवण नगरपालिकेला पत्रव्यवहार करून मालवण किनाऱ्यावर होणाऱ्या अस्वच्छतेबाबत कळविले होते, तसेच पाठपुरावा देखील केला. परंतु राजकीय सत्तासंघर्षात मश्गुल असणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधक कोणालाही शहराचे भूषण असणाऱ्या मालवण समुद्रकिनाऱ्याकडे पाहण्यास वेळ नाही हे मालवण वासीयांचे दुर्दैव होय.
मालवण नगरपंचायतीने आपल्या स्वच्छता कर्मचार्यांकरवी आठवड्यातून एक दोन वेळा जरी मालवण समुद्र किनारपट्टी स्वच्छता मोहीम राबविली तरी देखील किनारपट्टी स्वछ, सुंदर राहील आणि मालवण शहराच्या पर्यटनाला वाव मिळेल. मालवण नगराध्यक्षांनी नागरिकांच्या सुचनांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे…..कारण नागरिक हेच शेवटी कर्तेधरते आहेत…तेच गादीवर बसवतात आणि उतरवतात…

प्रतिक्रिया व्यक्त करा