You are currently viewing विशाल पर्व….!

विशाल पर्व….!

*राष्ट्रपती भवनातून सन्मान*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले बरेच दिवस प्रत्येकाच्या मुखात चर्चेत असलेले एकच नाव म्हणजे…विशाल परब…!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत अनेकांनी सांस्कृतिक महोत्सव, मनोरंजनात्मक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा असे नानाविध उपक्रम घेतले. परंतु कोणतीही राजकीय अभिलाषा न बाळगता, सामाजिक जाणिवेतून एवढा अवाढव्य खर्च आजपर्यंत पहिल्यांदाच कोणीतरी केल्याचे दिसून आले. जुबिन नौटीयाल सारख्या तरुणाईच्या मनावर राज्य करणाऱ्या आघाडीच्या गायकाला सावंतवाडी सारख्या छोट्याशा शहरात लाईव्ह कन्सर्ट साठी आणणे म्हणजे कोणा बलाढ्य नेत्याच्याही आवाक्यातले नाही… कुडाळ शहरात अलोट गर्दीत पार पडलेला ह.भ.प.इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम आणणे हे सुद्धा यापूर्वी कोणी विचारात घेतले नसेल. परंतु ही किमया केली ती पूर्वीपासून राजकीय वलयात वाढलेल्या माणगाव खोऱ्यातील एका ३६ वर्षीय तरुण उद्योजकाने ज्याचे नाव आहे…विशाल प्रभाकर परब…!

आपल्या वाढदिवसानिमित्त विशाल परब यांनी सावंतवाडीसह कुडाळ शहरात विशाल पर्व…या मथळ्या खाली गेले आठ दिवस विविध कार्यक्रम घेतले. विशाल परब मित्रमंडळ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली ती कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनामध्ये दिसून आली. महिलांसाठी, युवकांसाठी स्पर्धा घेतल्या. गेल्यावर्षी तर कुडाळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक महानाट्य घेतले. आपले राजकीय गुरू नाम.नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांचे वाढदिवस तर लाखोंचा खर्च स्वतः करून साजरे केले. विशाल परब यांनी जिल्ह्यात नवनवीन कार्यक्रम घेऊन युवा वर्गाला आकर्षित केले आणि “विशाल पर्व” म्हणजे विशाल परब या नावाची दखल घेण्यास भाग पाडले. सावंतवाडीत झालेल्या जुबीन नौटीयाल यांच्या कार्यक्रमासाठी रात्री बारा वाजेपर्यंत जिमखाना मैदानावर उसळलेला युवकांचा अलोट गर्दीचा जनसमुदाय म्हणजे “न भूतो न भविष्यती” असाच होता. कोणत्याही राजकीय लाभासाठी, आमदार, खासदार आदी बनण्यासाठी राजकीय हेतूने विशाल परब समाजकार्य करत नसून जिल्ह्यातील युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी देशविदेशात जसे आयटी पार्क आहेत, पर्यटनावर आधारित प्रकल्प आहेत तसे जिल्ह्यात उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. अवघ्या वयाच्या ३६ व्या वर्षी कोणतेही राजकीय मोठे पद अथवा लोकप्रतिनिधी म्हणून कारकीर्द गाजवलेली नसताना उद्योग क्षेत्रात कार्यरत राहून विशाल परब यांनी घेतलेली गरुड झेप म्हणजे युवकांसाठी प्रेरणादायी…! विशाल परब हे युवकांचे आयडॉल बनले आहेत असं विशाल परब स्वतःच सांगतात त्यामुळे युवकांनी त्यांनी आणलेले केवळ कार्यक्रम पाहून खुशीत गाजर खाण्यापेक्षा जिल्ह्यातील युवा वर्गाने त्यांच्या यशाचे गमक जाणून घेऊन त्यांच्या प्रमाणेच आपल्या भविष्याची वाट निश्चित करावी तर मग जिल्ह्यातील युवा बेकार, बेरोजगार राहणार नाही. जिल्ह्याच्या बाहेर नोकरीसाठी तळमळत जाणार नाही हे मात्र नक्कीच..!

विशाल परब यांनी आपल्या यशाची हवा डोक्यात जाऊ न देता अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येकाला आदराने मानाने व्यासपीठावर विराजमान केले. केंद्रीय मंत्री, राज्यातील, गोवा राज्यातील मंत्री, आमदार, भाजपा सहित सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी आदी अनेकांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. “खुद्द राष्ट्रपती भवनामधून त्यांच्या वाढदिवसा निमित्त तावडे या UPSC अधिकारी यांच्या करवी पेन भेट म्हणून पाठविले” यावरून त्यांची उंची सर्वसामान्य लोकांना ज्ञात झाली आहे. आपल्यासाठी झटलेल्या प्रत्येकाचे विशेष आभार मानण्याची त्यांची वृत्ती अनेकांना भावली. विशाल मनाच्या विशाल परब यांनी आपल्या कार्यकर्तृत्वामधून स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच देशभरातून अनेक मान्यवरांची मांदियाळी त्यांच्या कार्यक्रमास अनुभवता आली. राजकीय जीवनात आपला आदर्श आणि गुरु मानतात ते नाम. नारायण राणे, निलेश राणे आदी राणे कुटुंबीयांची अनुपस्थिती मात्र अनेकांना खटकली. कार्यक्रमाचा आस्वाद घेताना अनेकांच्या बोलण्यातून राणे कुटुंबियांच्या अनुपस्थिती बाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात असल्याचे ऐकू येत होते. आपला छोटा भाऊ म्हणणारे निलेश राणे देखील विशाल परब यांच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहिल्याने अनेक शंका कुशंका उपस्थित होत होत्या. *का आले नसतील राणे कुटुंबीय..?* असे प्रश्न अनेक जण एकमेकांना विचारत होते. परंतु संपूर्ण राणे कुटुंब अनुपस्थित असल्याने नक्कीच तसं महत्त्वाचं काम असेल अशीही अटकळ अनेकांनी बांधली. विशाल यांनी देखील राणे कुटुंबीय हेच आपले मार्गदर्शक…! त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपली वाटचाल. भविष्यात नाम.नारायण राणेंच्या व रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने पर्यटनाचे प्रकल्प राबविणार असे सांगून ते उपस्थित राहिले नाहीत परंतु फोनवरून शुभेच्छा दिल्याने कोणी गैरसमज करून घेऊ नये असे आवर्जून सांगितले.

एकीकडे लोक लाईव्ह कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते, कोणी आपल्या मोबाईल वर घरबसल्या कार्यक्रम पाहत होते परंतु कोणीही मोठा होत असताना “ज्याचं खायचं त्याच्याच घराचे वासे मोजायचे” या वृत्तीप्रमाने कुणी जुबिन नौटीयाल यांच्या कार्यक्रमाचा संबंध हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार मिथुन यांच्याशी जोडत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिथुन यांनी जमीन व्यवहार केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. त्यामुळे मिथुन यांचा या सर्व घडामोडींमध्ये काही संबंध आहे की काय..? असा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आहे. जे आज एवढ्या कमी वयात विशाल ने केले ते जिल्ह्यात सत्तेचे केंद्रबिंदू असणाऱ्या इतरांना कधी जमले नाही, बोलले पण रोजगार उपलब्ध करणे शक्य झाले नाही. त्यामुळेच विशाल परब यांच्या यशाची सल कुठेतरी मनात खुपत असल्याने त्यांच्या विरोधात वावड्या उठवून वातावरण दूषित करण्याचा देखील कुणाचा डाव असेल सांगता येत नाही. त्यामुळे अल्पावधीत विशाल परब यांना मिळालेलं यश, उद्योगात घेतलेली गरुड झेप किती जणांना मनापासून भावणार आणि कोण बोटे मोडणार हे सांगता येत नाही.

विशाल परब म्हणजे शांत संयमी माणूस. चेहऱ्यावर हलकं हास्य आणि साखरेचा गोडवा जिभेवर असावा एवढी मधाळ वानी. पर्यटन जिल्ह्याचे स्वप्न अनेकांनी पाहिले, काही प्रकल्प आले आणि कागदावरच राहिले. काही कुणाच्या मोठ्या महत्त्वाकांक्षा असल्याने लोकांनी स्वीकारले नाहीत. त्यामुळे जिल्ह्याचा विकास होणार हे आजपर्यंत जनता ऐकतच राहिली आहे. परंतु आजही जिल्हा विकासाच्या बाबत मागासलेला आहे. विशाल यांच्या रूपाने जिल्ह्याला नवा मार्ग सापडला आहे. त्यांनी जिल्ह्यातील युवकांच्या इच्छांना आशेचा एक नवा किरण दाखवला आहे. पर्यटन प्रकल्प, आयटी पार्क आदींची निर्मिती करून युवकांच्या हाताला काम देण्याचा त्यांचा मानस आहे. विशाल यांनी लावलेलं हा आशेचा वटवृक्ष आपली विश्वासाची मुळे युवकांच्या मनात खोलवर रुजवून खऱ्या अर्थाने युवकांच्या हाताला काम देऊन विकासाच्या फांद्या चहूकडे पसरवून डेरेदारपणे उभा राहणार की जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या महत्वाकांक्षेच्या वादळात हेलकावे खाऊन उन्मळून कोसळणार हे येणारा काळच ठरवणार. परंतु तोपर्यंत तरी जिल्ह्यातील युवा वर्गाच्या मावळलेल्या आशेच्या सुकलेल्या सड्यावर विश्वासाची हिरवळ रूजवून गेला हे मात्र नक्की..!

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 4 =