जातीवाचक नावाऐवजी आता वस्ती व रस्त्यांना मिळणार महापुरुषांची नावे…
१९२ वस्त्यांसह २५ रस्त्यांचा समावेश; राज्यात प्रथमच सिंधुदुर्गात अंमलबजावणी…
सिंधुदुर्गनगरी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ग्रामीण भागातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाची अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे.जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या स्वाक्षरीने या बदलाचा शासन निर्णय निर्गमित झाला असून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १९२ जातीवाचक वस्त्यांची व २५ जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्यात आली आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला.
जिल्हाधिकारी धोडमिसे आणि सहाय्यक आयुक्त संतोष चिकने यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामसभेच्या ठरावानुसार प्राप्त झालेले प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर करून जुनी जातीवाचक नावे बदलून नवीन प्रस्तावित नावांना अधिकृत मान्यता दिली आहे.
