सावंतवाडी अनुसूचित जाती महिलांसाठी, कणकवली मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित
मालवण, दोडामार्ग सर्वसाधारण महिला; कुडाळ, देवगड, वैभववाडी सर्वसाधारण गटासाठी
ओरोस :
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातील सभापती पदांसाठी आरक्षण ठरविण्यात आले आहे. त्यात सावंतवाडी येथे अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाले आहे. कणकवली येथे सभापती पद नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, तर वेंगुर्ले येथे नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असे आरक्षित झाले आहे.
मालवण आणि दोडामार्ग येथे सभापती पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. कुडाळ, देवगड आणि वैभववाडी या ठिकाणी सभापती पदे सर्वसाधारण राहिली आहेत. ओरोस बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ शाळेचा पाचवी वर्गातील विद्यार्थी स्वरूप कुमठेकर यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढत आरक्षण जाहीर करण्यात आले.

