डॉ.अभिजित चितारींची बदली म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार…

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून कोरोनाच्या संकटात डॉ.अभिजित चितारींची बदली म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार…

संपादकीय…..

एकेकाळी संपूर्ण जिल्ह्याची धुरा वाहणारे सावंतवाडीचे कुटीर रुग्णालय जिल्हा केंद्र आणि जिल्हा रुग्णालय ओरोस येथे गेल्यापासून फक्त प्रथमोपचार केंद्र झालं होतं. अगदी तापाचा रुग्ण सुद्धा जसा काय कूपन देऊन पुढे पाठवतात तसाच गोव्यात पाठवला जात होता, तिथे हृदयविकाराच्या रुग्णांची अवस्था तर विचारायलाच नको होती. डॉ.दुर्भाटकर होते म्हणून प्रसूतिशास्त्र विभाग तेवढा व्यवस्थित कार्यरत होता. परंतु मूळ सावंतवाडी येथीलच रहिवासी असलेले डॉ.चितारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आणि सावंतवाडी तसेच आजूबाजूच्या हृदयविकार आणि मधुमेही व तत्सम रुग्णांना आशेचा किरण दिसू लागला.
सावंतवाडीत एकही खाजगी रुग्णालय हृदयविकाराच्या रुग्णांना दिलासा देणारे नाही. तिथे उपजिल्हा रुग्णालयात डॉ. चितारी दाखल झाल्यापासून सावंतवाडीसह आजूबाजूच्या रुग्णांना चांगला लाभ मिळू लागला. अनेक हृदयविकाराच्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात मोफत किंवा अत्यंत माफक खर्चात उपचार मिळू लागले. अनेक लोक गोवा, कोल्हापूर येथे जाण्यापेक्षा सरकारी दवाखान्यात वळले. डॉ.चितारी म्हणजे सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयातील एकखांबी तंबू असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सावंतवाडीकर जनतेसाठी तर डॉ.चितारी म्हणजे देवदूतच ठरले होते.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर डॉ.चितारी हे सावंतवाडी रुग्णालयात दिवसरात्र सेवा देत असतात, कोणत्याही वेळी पेशंटसाठी रुग्णालयात धावत असतात, त्यामुळे देवदूत म्हणून नावलौकिक असलेले डॉ.चितारी यांची तडकाफडकी केलेली बदली म्हणजे राज्य शासन आणि आरोग्य प्रशासन यांनी सावंतवाडकरांची केलेली कुचेष्टा असून जखमेवर मीठ चोळून आरोग्य प्रशासनाने स्वतःचीच लक्तरे वेशीवर टांगल्यासारखी परिस्थिती आहे.
सावंतवाडी शहरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येणार, जाणार असं तळ्यात मळ्यात सुरूच आहे, आरोग्य सुविधांच्या नावाने कायमच शिमगा असतोच, तिथे प्रशासनाने सावंतवाडीकरांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉ.चितारींची बदली करून धुळवड करण्याचा विडाच उचललेला दिसत आहे.
सावंतवाडीचे आरोग्य सभापती ऍड. परिमल नाईक यांनी आरोग्य प्रशासन तथा राज्य सरकारच्या निर्णयावर कठोर टीका करत डॉ.चितारींची बदली म्हणजे एक सामाजिक चोरीचा प्रकार व गलिच्छ राजकिय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन डॉ. चितारींची बदली रद्द करावी अन्यथा सनदी मार्गाने अथवा वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा सुद्धा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शांत संयमी असलेल्या सावंतवाडीकर जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडण्या अगोदर आरोग्य प्रशासन व राज्य सरकारने डॉ.चितारींची केलेली बदली रद्द करावी अशी मागणी सावंतवाडीवासीयांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =