You are currently viewing दीपक केसरकर महाराष्ट्रातील राजकारणात केंद्रस्थानी

दीपक केसरकर महाराष्ट्रातील राजकारणात केंद्रस्थानी

संपादकीय…

कोकणच्या राजकारणात यापूर्वी मुख्यमंत्री होऊन गेलेले बॅरिस्टर अंतुले, आरोग्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम केलेले सावंतवाडीचे भाईसाहेब सावंत आणि गेली तीन दशके सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आपली सत्ता राखलेले, महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केलेले माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांच्याच परिचयाचा झालेला चेहरा म्हणजे माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दीपक भाई केसरकर…!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहराचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार, मंत्री अशाच एक एक पायऱ्या चढत यशाकडे गेलेले सुंदरवाडीचे सुपुत्र आमदार दीपक केसरकर आजच्या घडीला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. आम. दीपक केसरकर यांची राजकारणात एन्ट्री झाल्यानंतर ज्यावेळी त्यांना स्वतःला राजकीय दहशतवादाचा सामना करावा लागला तेव्हापासून त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात उघडपणे बोलण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण त्यांनी नारायण राणे यांच्या विरोधात उभे केले, आणि याचाच परिणाम म्हणून तिसऱ्या नंबरवर फेकली गेलेली शिवसेना पुन्हा एकदा पहिल्या नंबर वर आली. दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या विरोधात सुरू केलेली राजकीय लढाई नारायण राणे यांना बॅकफूटवर घेऊन गेली आणि राज्याच्या राजकारणात नारायण राणे यांना तब्बल दोन वेळा विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीत नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांना दोन वेळा दीड लाखापेक्षा अधिक मतांच्या फरकाने निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहण्याची नामुष्की आली. नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यावर असलेली एक हाती सत्ता दिपक केसरकर यांनी पालटून टाकली. तेव्हाच राज्याच्या राजकारणात दीपक केसरकर हे नाव आदराने घेतले जाऊ लागले.
महाराष्ट्रात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडी सरकार स्थापन करून सर्वात मोठा व शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसण्याची पाळी आणली. महाराष्ट्रात शरद पवार यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद असूनही सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादीकडेच राहिल्या. त्यामुळे शिवसेनेचे आमदार नाराज झाले आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 39 शिवसेना व सात अपक्ष आमदारांनी बंड करून वेगळा गट स्थापन केला. शिवसेनेचे सर्वेसर्वा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा फार मोठा धक्का होता. उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घालून देखील शिवसेनेचे आमदार मुंबईत परतले नाहीत, परंतु शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आपण शिवसेनेतच आहोत व शिवसेना सोडून जाणार नसल्याचे सांगून आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शिवसेना पक्ष संपवत असल्याचा थेट आरोप केला. एकनाथ शिंदे गटाकडून मिडीयासोबत बोलण्यासाठी शांत संयमी व अभ्यासू आमदार म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख असलेले माजी गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांची प्रवक्ते म्हणून नेमणूक केली. दीपक केसरकर यांनी आपल्यावर टाकलेला आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवताना पत्रकार परिषदांमध्ये आपल्यामध्ये असलेल्या हुशारीची व कायदेशीर ज्ञानाची झलक दाखवताना पत्रकारांच्या प्रश्नांना योग्य व अचूक उत्तरे देत बंडखोर गटाची बाजू संपूर्ण राज्याच्या, देशाच्या समोर मांडून, आम्ही सर्व बंडखोर आमदार असलो तरीही आजही उद्धव ठाकरे यांना मानत असून आपण बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असल्याचे सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो नसून पुढेही शिवसेनेतून बाहेर जाणार नाही अशी ग्वाही देत प्रवक्ता कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात दाखवून दिले.
आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात कोकणचं नाव येताच केंद्रीय मंत्री नारायण राणे हेच सर्वांच्या नजरेसमोर येत होते आणि नारायण राणे यांचा राज्याच्या राजकारणात दबदबा सुद्धा होता. परंतु नारायण राणे यांच्या नंतर आता राज्याच्या राजकारणात सर्वांच्या मुखात बसलेले आणि गाजत असलेले नाव म्हणजे आमदार दीपक केसरकर….! सावंतवाडीत केसरकरांच्या विरोधात जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला होता, परंतु दीपक केसरकर यांची लोकप्रियता एवढी आहे की केसरकरांच्या मतदारसंघातील हाताच्या बोटावर मोजण्याऐवढे पदाधिकारी वगळता शिवसेनेचा एकही नगरसेवक अथवा केसरकर यांच्यासोबत शिवसेनेत आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले नाहीत. जिल्ह्यातून विरोध दर्शवत जरी शिवसैनिक आले तरी स्थानिक मतदारांनी केसरकर यांची साथ सोडली नसल्याचे दिसले. त्यामुळे मतदारसंघातील जनतेचा केसरकर यांच्या भूमिकेला पाठिंबाच असल्याचे दिसून आले.
आपल्या शांत संयमी स्वभावामुळे व अभ्यासू वक्तव्यामुळे आणि मराठी भाषे बरोबरच हिंदी, इंग्रजी इत्यादी भाषांवर असलेले प्रभुत्व यामुळे दीपक केसरकर शिवसेना बंडखोर गटाचे प्रवक्ते म्हणून बोलताना प्रवक्त्या मधील चुणूक दाखवून देतात.आम.दीपक केसरकर यांच्या मुद्देसूद व अभ्यासू बोलण्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी “शिवसेनेकडे दीपक केसरकर यांसारखे अभ्यासू हुशार व्यक्तीमत्व असताना इतरांना प्रवक्ते म्हणून का नेमले?” असे प्रश्न उपस्थित केले आहेत. दीपक केसरकर यांनी बंडखोर गटाचे प्रवक्ते म्हणून प्रत्येक वेळी पत्रकार परिषदेला सामोरे जात आपली वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण केली आहे. त्यामुळे भविष्यात कोकणातील हुशार अभ्यासू नेतृत्व म्हणून आमदार दीपक केसरकर यांच्याकडेच पाहिले जाईल याबद्दल शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =