दारूच्या नशेत मुलाचा अमानुष कृत्य!
आईचा कोयत्याने खून करून घरात ओढत आणले
कणकवली
कणकवली तालुक्यातील वारगाव सोरफ – सुतारवाडी येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. दारूच्या नशेत चुरसलेल्या मुलाने आपल्या ८० वर्षांच्या आईचा कोयत्याने निर्घृण खून केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे नाव प्रभावती रामचंद्र सोरफ (वय ८०) असे असून, रवींद्र रामचंद्र सोरफ (वय ४५) या तिच्या मुलानेच हा थरारक प्रकार केला. बुधवारी रात्री सुमारे ११.३० वाजता दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. मात्र, रवींद्रने संतप्त होऊन थेट कोयत्याने आईवर डोक्यासह अनेक ठिकाणी सपासप वार केले. इतकेच नव्हे तर, रक्तबंबाळ अवस्थेतील आईला ओढत घराच्या हॉलमध्ये आणल्याने उपस्थित कुटुंबीय थरकले.
सदर घरात एकाच कुटुंबाची पाच बिऱ्हाडे असून, काही क्षणांत घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी केली असता प्रभावती यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या शरीरावर कोयत्याचे गंभीर वार आढळून आले.
दरम्यान, रवींद्र याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी सकाळी सुरू करण्यात आली आहे. त्याच्यावर सध्या कसून चौकशी सुरू असून, पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.
या अमानुष घटनेने वारगाव परिसरात भीतीचे व दुःखाचे वातावरण पसरले आहे. दारूच्या व्यसनामुळे एका मुलाने आईच्या मायेची कदर न ठेवता थेट तिचा जीव घेतल्याने समाजमन हेलावून गेले आहे.

