You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती

सिंधुदुर्ग :

महाराष्ट्र शासनाने काजूप्रक्रिया उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर तज्ज्ञ संचालक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष प्रकाश दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयान्वये काजू क्षेत्रातील अनुभव व अभ्यास लक्षात घेऊन ही निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्यातील काजू फळ व उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी १६ मे २०२३ रोजी राज्य काजू मंडळाची स्थापना करण्यात आली असून, मंडळाच्या सुचालनासाठी १२ संचालक व १ सचिव अशी रचना आहे. यामध्ये काजू उत्पादक शेतकरी, प्रक्रिया उद्योग, सहकारी क्षेत्र तसेच तज्ज्ञ संचालकांचा समावेश आहे. त्यानुसार श्री. मनीष दळवी यांची तज्ज्ञ संचालक पदावर नियुक्ती झाली आहे.

काजू मंडळामार्फत काजू उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपणूक, प्रक्रिया उद्योगांना सहाय्य, शेतकरी व उद्योजकांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, तसेच संशोधन व प्रशिक्षण या बाबींसाठी योजना राबवल्या जातात. अशा स्थितीत श्री. दळवी यांच्या नेतृत्वाचा व अनुभवाचा फायदा संपूर्ण काजू उद्योग क्षेत्राला होणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

त्यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी व उद्योजक यांच्यात आनंदाचे वातावरण असून, जिल्ह्यातील काजू उद्योगाच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा