वेंगुर्ल्यात दोन बिबट्यांचा मुक्त संचार..

वेंगुर्ल्यात दोन बिबट्यांचा मुक्त संचार..

ग्रामस्थांमध्ये पसरले कमालीचे भीतीचे वातावरण..

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ले बेळगाव महामार्गावर हम रस्त्या नजीकच्या भागात कुबलवाडा, महाजनवाडी व वेंगुर्ला शहर भागात दोन बिबट्याचा मुक्त संचार काल आणि आज पहावयास मिळाला. भटक्या कुत्र्याचा या बिबट्याने फडशा मारला. त्यामुळे भरवस्तीतच बिबट्या वावरत असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

काल ५ जून रोजी वेंगुर्ला बेळगाव रोडवरील आयटीआय कन्याशाळेनजीक बिबट्याने दोघा दुचाकीस्वारांच्या समोरच उडी मारून रस्ता पार केला होता. त्या दुचाकीस्वाराचे नशीब बलवत्तर म्हणून अनर्थ घडला नाही. यावेळी एक बिबट्या दिसला होता. रात्र अनेकांनी जागूनच काढली. प्रत्येकाने आपल्या भागात फोन वरून माहिती देत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

 

कुबलवाडा परिसरात एका व्यक्तीला आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा गुरगुरन्याचा आवाज आल्याने आपल्या घरातूनच बॅटरीने प्रकाशात पाहिले असता जांभळीच्या झाडावर दोन बिबटे दिसले. सदर व्यक्ती घाबरल्याने त्याने कोणासच पहाटे कल्पना दिली नाही. सकाळ होताच परिसरातील सर्वांना कल्पना दिली परंतु सकाळीच ते बिबटे दुसरीकडे गेले. या झाडांवर बिबट्याच्या नखांचे ओरबडे दिसल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. मात्र येथील भागातील भटक्या कुत्र्याचा फडशा पडला याची कल्पना वन विभागास व पोलिसांना नागरिकांनी दिली आहे. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे मात्र भयभीत वातावरण शहरात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा