शेजारील घर फोडण्याचाही चोरट्यांचा प्रयत्न
देवगड : देवगड तालुक्यातील हिंदळे मोर्वे ओवळेश्वरवाडी वाडी येथील अविनाश काशिराम हिंदळेकर (५४) यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील सुमारे २० हजारची रोकड लंपास केली. शेजारील शारदा शरद शिरवडकर यांचेही बंद घर फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. ही घटना ७ जुलै रोजी सायंकाळी ७.०० ते ८ जुलै रोजी सकाळी ९.०० वाजण्याच्या कालावधीत घडली. दाखल फिर्यादीनुसार, देवगड पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश हिंदळेकर हे नोकरीनिमित्त मुंबई-गोरेगाव येथे वास्तवास आहेत. त्यांचे गावातील घर बंद असते. त्यांचा घराच्या परिसरातील साफसफाईचे काम त्यांच्या भावजय सुप्रिया संतोष हिंदळेकर या करतात. अविनाश हिंदळेकर यांच्या घरानजीक राहत असलेल्या नम्रता सुशांत बापर्डेकर यांनी सुप्रिया हिंदळेकर यांना, ‘तेथील शारदा शिरवडकर यांच्या घरी चोरी झालेली आहे. त्यामुळे अविनाश हिंदळेकर यांचे बंद घरही तू चेक कर’, असे सांगितले.
त्यानुसार सुप्रिया हिंदळेकर यांनी अविनाश हिंदळेकर यांच्या घराची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना घराच्या मागील दरवाजाचे कुलूप कोणत्या तरी हत्याराने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची माहिती त्यांनी घरमालक अविनाश हिंदळेकर यांना फोनवरून दिली हिंदळेकर हे मुंबईहून गावी मोर्वे येथे आले त्यांनी देवगड पोलीस चोरीच्या घटनेची स्थानकात फिर्याद दिली.
अज्ञात चोरट्यांनी आपल्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आतील बेडरुमच्या कपाटातील २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केली. तसेच आपल्या घरानजीक शारदा शरद शिरवडकर यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीनुसार, देवगड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३०५, ३३१ (३), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई करीत आहेत.

