You are currently viewing डोळा देखिला भगवंत

डोळा देखिला भगवंत

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकारा सुनंदामाई पाटील गझलनंदा लिखित आषाढी एकादशीनिमित्त अप्रतिम लेख*

 

 

*डोळा देखिला भगवंत*

 

सध्या समस्त वारकरी मंडळी ” पाऊले चालती पंढरीची वाट ” या अवस्थेत आहे. एकच आस . डोळाभरून विठ्ठलाचे दर्शन घ्यावे . ती साजिरी गोजिरी मूर्ती डोळ्यात साठवावी . आषाढीला माउलीचं दर्शन व्हावं ! दरवर्षी लाखो वारकरी विठू माऊलीच्या दर्शनाला जातात !

माझ्या आईबाबांचीही तीच इच्छा होती. पण आमचं खेडंगाव अतीपूर्व विदर्भातलं . गडचिरोली जिल्ह्यातील एक खेडे ! पावसाळ्यात चक्क बेट झालेलं . ३० /३५ वर्षापूर्वी वाहतुकीच्या सोयीही फारशा नव्हत्या ! त्यातून चातुर्मासाचे सर्व सणवार , बेताची आर्थिक परिस्थिती , भावंडांच्या , मुलांच्या जबाबदाऱ्या यामुळे त्यांचं पंढरपूरला जाणं कधीच झालं नाही. मात्र त्या चार महिन्यात बाबा ही विठू दर्शनाची खंत दरवर्षी बोलून दाखवायचे .

मग मला नोकरी लागल्यावर सावकाश मी त्यांना मोकळ्या दिवसात काही ठिकाणी देवदर्शन , प्रेक्षणीय स्थळे इथं फिरायला नेलं होतं . पण पंढरपूरला किंवा कुठेही मात्र पावसाळ्यात जाणं शक्य नव्हतं . म्हणून आषाढी वारी काही झाली नव्हती . त्यात पुढे वाढलेलं वय ! म्हणून कार्तिकी एकादशी साधून पंढरपुरला जायचं आम्ही ठरवलं . आणि कदाचित कुणाचाही विश्वास बसणार नाही अशीच विलक्षण घटना घडली . सविस्तर सांगतेच .

 

तीस – पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट . मराठी महिना कार्तिक म्हणजे इंग्रजी महिना नोव्हेंबर . दिवाळी नुकतीच संपलेली . थंडी वाढू लागलेली . अशावेळी

माझ्या वयस्क आईबाबांना , आणि मुलगा सागर वय ७ वर्षे , यांना सोबत घेऊन मी प्रवासाला निघाले . एस टी . महामंडळाचा प्रवास . एक एक दर्शन घेत पुढे पंढरपूरला दर्शनासाठी गेले .

माहेरी वारकरी संप्रदायाची भजनं वगैरे नेहमीच होत असत . अजूनही ती होतात. पण तेव्हा अनेक कारणांनी आई बाबांचे पंढरपूर दर्शन राहिले होते . त्यात आषाढी किंवा कार्तिकी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घडायला हवे अशी बाबांची तीव्र इच्छा होती.

 

कार्तिक शुध्द दशमीला पंढरपूरला पोचलो . तिथे संत गजानन महाराज धर्मशाळेत एक खोली घेऊन रात्रभर मुक्काम केला. एकादशीला लवकर उठून चंद्रभागेवर आंघोळ केली. नंतर दर्शन ! गर्दीची फारशी कल्पना नव्हती आम्हाला . पण दर्शनासाठी बघतो तर काय? थेट गोपाळपुरीपर्यंत लांबच लांब रांग लागलेली . काय घडलं ठावूक नाही . पण म्हातारे आईबाबा आणि लहान मूल बघून काही लोकांनी आम्हाला मदत केली, आणि आम्ही थेट ज्ञानेश्वर मंदिर सभागृहात दर्शन रांगेत उभे राह्यलो . आम्हाला ५ / ६ तासात चक्क कार्तिकी एकादशीला विठ्ठल मूर्तीचे दर्शन झाले. खूप भरून आलं . भजन , कीर्तन , दिंड्या यात एकादशीचा दिवस संपला .

पण माणसाची इच्छा अमर्याद असते. विठू माउलीच्या एका दर्शनाने बाबा तृप्त नव्हते. विठूमाऊलीचं आणखी दर्शन त्यांना हवं होतं आणि ते केवळ अशक्य होतं . व्दादशीलाही पंढरपूरला प्रचंड गर्दी होती ….

 

द्वादशीला आम्ही कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघणार होतो. पहाटे आंघोळी आटोपून किमान श्रींचं मुखदर्शन किंवा मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यावं म्हणून देवळाच्या परिसरात आलो . मुखदर्शना साठीही मोठी रांग होती . म्हणून संत नामदेव पायरीशी पोचलो . गर्दी प्रचंड होती . सकाळचे सहा वाजले असावे. नदी ते मंदीर भक्तांची येजा सुरू होती ! सूर्य सुद्धा उगवायचा होता !

 

आम्ही संत नामदेव पायरीचे आणि कळसाचे दर्शन घेतले . आत जाता येत नाही, प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घेता येत नाही , म्हणून बाबांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. आईचीही तीच अवस्था होती . आई बाबा तिथेच घुटमळत होते . मी मात्र पुढे गाडी पकडायची म्हणून अस्वस्थ होते. कारण पुढे कोल्हापूर , वाडी , औदुंबर असा प्रवास करायचा होता !

 

मी माझ्याच विचारात गर्क होते , तेवढयात ७ आणि १० वर्षाच्या आत बाहेर असलेली दोन शाळकरी , अनुक्रमे मुलगी आणि मुलगा आम्हाला दिसले . निळा स्कर्ट , पांढरा ब्लाऊज , लाल रिबन लावून वेण्या वर बांधलेल्या , कपाळी कुंकू , पाय अनवाणी असा मुलीचा पोषाख आणि निळी हाफ पँट , पांढरा शर्ट , कपाळी उभं गंघ, अनवाणी पाय असा मुलाचा पेहराव होता . रंगाने दोघेही काळे सावळेच होते. पण हसणं मोहक होतं . आवाज छान होता. दिसायला दोन्ही बाळं गोड होती.

 

हसतच ती मुलं समोर आली आणि आम्हाला म्हणाली , “तुम्हाला दर्शन घ्यायचंय का मावशी ? ”

“चला आमच्या बरोबर. दुसऱ्या दरवाज्याने आपण आत जाऊ ! त्या मुलीने माझ्या मुलाचा , सागरचा हात हातात धरला , आणि सरळ चालू लागली . ती मुलगी , सागर आणि तो मुलगा यांच्या मागे संमोहित झाल्यासारखे आम्ही तिघंही चालू लागलो . आम्ही सर्व जण काही मिनिटातच एका गेटपाशी आलो . समोर जाऊन दारावरच्या रखवालदाराशी तो मुलगा काहीतरी बोलला सागरचा हात मुलगी उभी होती . आणि रखवालदाराने गेटचा छोटा दरवाजा उघडून आम्हाला आत सोडलं . त्यावेळी आम्ही चौघेही फक्त मंदिर आणि दर्शन यात गुंतलो होतो. आता सागरने माझा हात धरला होता ! एका मागोमाग एक आम्ही गेटच्या आत आलो . ती दोन मुलंही आमच्या बरोबरच होती . परिसर आम्हाला नवीन वाटला, पण काही क्षणातच आम्ही विठ्ठलमूर्तीच्या पुढ्यात होतो . छान दर्शन झालं पांडुरंगाचं . नंतर रूक्मिणी मातेचं दर्शन घेतलं . आणि ज्या वाटेने आम्ही आत गेलो , त्याच वाटेने बाहेर आलो. मी माझ्या मुलाचा हात धरूनच होते , आणि आई बाबा माझ्या पाठोपाठ होते . मधल्या काळात गर्दीत त्या दोन मुलांशी आमची कधी तरी चुकामुक झाली . बाहेर तर आलो , पण आधीचा रखवालदार आम्हाला तिथे दिसला नाही . आम्ही जरासे गोंधळलो. नवीन रखवालदार तिथे उभा होता . वाटलं बदलला असेल कदाचित ?

 

त्या नवीन गृहस्थाला , रखवालदाराला मी ” ती शाळकरी मुलं कुठं गेली ? .. ” असं विचारताच तो हसला . म्हणाला “अहो ताई , पंढरपुरात सध्या शाळा सुरू नाहीत . आणि एवढया पहाटे अशी छोटी शाळेची मुलं कशी दिसणार हो ? बघा एकतरी लेकरू दिसतंय का इकडं ? ” खरंच मला कुणीच विद्यार्थी दिसत नव्हते !

 

मी त्या दोन मुलांचं वर्णन करताच तो रखवालदार चक्क रडू लागला . आमच्या पाया पडू लागला . आम्हाला काहीच कळेना .

” अहो दादा आम्हाला का नमस्कार करताय ? ” मी विचारलं !

ते म्हणाले , “अहो ताई , तुम्हाला देवानं दर्शन दिलं. प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाईनं ”

अहो प्रत्यक्ष परमेश्वर आले होते इथे . त्यांनीच तुम्हाला आत सोडलं दर्शनासाठी .” आणि तो रखवालदार दुसरा कुणीच नव्हता , तर संत नामदेव महाराज होते ते. ”

 

आम्हाला काय करावं सुचत नव्हतं . डोळ्यातून फक्त घळघळा अश्रू वाहू लागले . आम्हाला विठ्ठलाने प्रत्यक्ष दर्शन दिले होते .आमच्याशी देव स्वतः बोलला होता, माझ्या मुलाचा हात रखुमाईनं हाती घेतला होता , यावर आमचा विश्वासच बसत नव्हता.

 

जगात देव आहे की नाही , हे ठावूक नाही . पण जे काही घडलं ते अगदी अविश्वसनीयच पण भाग्याचं होतं. कितीतरी वेळ आम्ही , ती मुलं नव्हे परमेश्वर आम्हाला भेटले तिथे नतमस्तक झालो . अनेक लोक येऊन आमच्या पाया पडत होते . आम्ही फक्त अबोल झालो होतो .

देवाने भक्तांची सेवा केली , प्रत्यक्ष दर्शन दिले हे वाचलं होतं ! आणि आज अनुभवलं होतं !

 

माझी आई कै. सौ. शकुंतला दीक्षित आणि बाबा कै . लक्ष्मीकांत उर्फ बाळासाहेब दीक्षित एका पाठोपाठ २०२१ साली आम्हाला पोरकं करून दोन वर्षांपूर्वी निघून गेली. त्यांच्या सोबतचे क्षणन् क्षण आठवत होते. वारी आली की काहूर माजतं मनात .आज ही आठवण ताजी झाली. एवढंच ….

 

हा परमभाग्याचा क्षण आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही .

 

अशा अनेक अकल्पित घटना माझ्या सोबत घडल्या आहेत. पुढे केव्हातरी सांगीनच .

तोवर बघूया फक्त परमेश्वरी लीलांकडे !!!

 

प्रा. सुनंदा पाटील , मुंबई

८४२२०८९६६६

 

 

(सत्यघटना)

प्रतिक्रिया व्यक्त करा