You are currently viewing मेघदूत

मेघदूत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*मेघदूत*..

 

भारतीय मनाला नेहमीच भुरळ घालणारं कालिदासाचं मेघदूत म्हणजे प्रियतमेच्या विरहाने व्याकूळ झालेल्या प्रियकराचं आर्त मन..

कालिदासांनी लिहिलेल्या ‘”मेघदूत'” या काव्याच्या दुसऱ्या श्लोकातील शेवटच्या दोन ओळी..

“!! आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श” !! अशा आहेत. त्यामुळे आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच आषाढ शुद्ध प्रतिपदा ही तिथी ‘”कालिदास दिन'”म्हणून साजरी केली जाते..

मेघदूत (खंडकाव्य)— वियोगामुळे व्याकुळ झालेल्या यक्षाने आपल्या प्रिय पत्नीला मेघाबरोबर पाठविलेला संदेश म्हणजे कालिदासाच्या प्रतिभेचा विलासच होय..

मेघदूत हे कवी कालिदासाने रचलेले संस्कृत भाषेतील खंडकाव्य आहे..या खंडकाव्याचा रचनाकाळ गुप्तकाळात इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडांतला असल्याचे मानले जाते…

हे खंडकाव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ या दोन भागांमध्ये विभागलेले आहे.

पूर्वमेघात मध्यभारतातील रामगिरीपासून हिमालयाच्या अंतर्भागात वसलेल्या अलका नगरीपर्यंतचा प्रवासमार्ग यक्षाने वर्णन करून सांगितला आहे व त्या त्या मार्गावरील डोंगर, नद्या, अरण्ये, उपवने, नगरे, मंदिरे आणि मुख्य म्हणजे त्या त्या ठिकाणचे समाज जीवन यांचेही हृद्य विहंगमावलोकन कवीने वाचकाला घडविलेले आहे.. तर उत्तरमेघात यक्षाच्या घराचे तपशीलवार चित्रण कवीने वर्णिलेले आहे… ही यक्षपत्नी रसिक वाचकाच्या मनात घर करणारी आहे..

पत्‍नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्‍नीला मेघाबरोबर पाठवलेला संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे… मेघदूत हे विरहरसात बुडालेल्या यक्षाच्या मनात मेघाला पाहून उचंबळून आलेल्या विचारांचं काव्य आहे. खरं तर यक्षाच्या एकटेपणाच्या निमित्ताने कालिदासासारख्या महान कवीला स्फुरलेलं हे काव्य….

विरहात तळमळणारा यक्ष आकाशात मेघाला पाहतो आणि प्रेमात वेडा झालेला तो यक्ष त्या चेतनाहीन मेघाला आपला दूत बनवून पाठवण्याचं निश्चित करतो….मेघदूत हा केवळ मेघाला आपल्या घरी जाण्यासाठी सांगितलेला मार्ग आहे यक्षाच्या घराचा पत्ता आहे.. कालिदासासारख्या सिद्धहस्त लेखकाचा स्पर्श… पत्ता सांगण्याच्या निमित्ताने एक सुंदर काव्य निर्माण ते मेघदूत..

अमोघ शब्दकळा, अर्थसघनता आणि भावपूर्णता याचा त्रिपुटीसंगम या काव्यशिल्पात झालेला आहे किंबहुना मेघदूत मध्ये जागोजागी तो आढळतो.

“मेघदूत”’ या काव्याचा गाभा शृंगाररसावर आधारलेला आहे. त्यातही साहित्याच्या दृष्टीनं श्रेष्ठ असा हा विप्रलंभ- शृंगार म्हणजे विरहातला मनोवेधक शृंगार आहे. साहजिकच शृंगारातल्या सा-या उत्कट भावनांचा आणि विभ्रमांचा आविष्कार…

कालिदास हा संस्कृत भाषेतला सुसंस्कृत कवी असल्याने तो निसर्ग सुलभ प्रकृतीचा आविष्कार करतो. ..

मेघदूतातील काव्ये म्हणजे जणू मयूरपंखावरील मनोहारी रंगछटाच..!

विरहाच्या दाहक वणव्यातही प्रणयाचा गंध लेवून बकुळीचा गंध-मळा फुलावा हा या नश्वर जगापलिकडला प्रेमाचा आविष्कार म्हणावा लागेल..

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी— ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा