You are currently viewing शब्द माझे आणि मी

शब्द माझे आणि मी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शब्द माझे आणि मी*

 

शब्द माझे अवकाश

शब्द चांदण्यांचा घडा

शब्द जणू अंगणात

प्राजक्ताचा शुभ्र सडा….

 

शब्द रेशमाची लड

शब्द आईचा पदर

शब्द गोंजारती मला

शब्द देती सदा धीर….

 

शब्द हिरव्या रानात

शब्द कोकीळ कूजन

शब्द कान्हाची पावरी

कानी मधुर तो स्वर…..

 

शब्द अवती भवती

शब्द लळा नि जिव्हाळा

गोंजारता लडिवाळ

लेखणीत शब्दकळा….

 

शब्द हरवता कधी

होई मला सुचेनासे

रिता कागद समोर

दृष्टी शून्यातच वसे….

 

शब्द अश्रू डोळ्यामधे

शब्द हसू ओठातील

शब्द छंद आवडता

शब्द डोह खोल खोल…

 

शब्द माझे मीही त्यांची

बंध त्यांचे सोडवेना

नित्य काव्यातून भेट

काळजात ही कामना….!!

 

~~~~~~~~~~~

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा