सावंतवाडी :
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथील अपघात विभाग कडील सौ. सेजल संदीप कोटकर यांनी स्व: खर्चाने 17 हजार रुपये एवढ्या किमतीची शेड उभारून दिली. सदर शेड उभारणीसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्त सुजय सावंत व संदीप सावंत यांनी मदत केली. उन्हाळ्यामध्ये व पावसामध्ये ॲम्बुलन्स मधून स्ट्रेचरवरून पेशंट कॅज्युलिटीमध्ये नेत असताना पावसात पेशंट अगदी चिंब भिजायचा याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे व रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य रवी जाधव यांनी सावंतवाडीचे प्रसिद्ध कॅटरर्स व्यावसायिक संदीप कोटकर यांच्याजवळ सदर शेड उभारणीचा प्रस्ताव ठेवला असता संदीप कोटकर यांनी अवघ्या दोन दिवसांमध्ये सदर शेड उभारून दिली.
तसेच कॅज्युलिटी अपघात विभाग दर्शक डिजिटल बोर्ड सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी स्वखर्चाने लावला यासाठी भवानी आर्ट्सचे अभिजीत सावंत यांनी मदत केली.
आता सदर शेडमुळे ऊन व पावसामुळे होणारा त्रास रुग्णांना सहन करावा लागणार नाही. तसेच आता लवकरच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अपघात विभागामध्ये डिजिटल ड्रेसिंग रूम लवकरच तयार करून घेणार असल्याची माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे व रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य रवी जाधव यांनी अधीक्षक डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे यांना दिली आहे.
श्री संदीप कोटकर व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा हा रुग्णांच्या सेवेसाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले आहे. याप्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, सेजल कोटकर, शरदिनी बागवे, रूपा गोंडर (मुद्राळे), लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.