You are currently viewing महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री वनमोरे शिवापूर ग्रामपंचायतीत वीज ग्राहकांच्या बैठकीस राहणार उपस्थित

महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री वनमोरे शिवापूर ग्रामपंचायतीत वीज ग्राहकांच्या बैठकीस राहणार उपस्थित

*पंचकोशीतील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि वीज ग्राहकांनी उपस्थित राहण्याचे जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे आवाहन*

कुडाळ :

वीज ग्राहक संघटनेच्या शुक्रवारी झालेल्या चर्चेत अधीक्षक अभियंता यांनी बुधवार दिनांक २५ जून रोजी दुपारी ३.०० वाजता शिवापूर येथील वीज ग्राहकांसोबत बैठक घेण्याचे मान्य केले होते. त्यानुसार उद्या कार्यकारी अभियंता श्री वनमोरे स्वतः ग्रामस्थांसोबत चर्चेसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंचक्रोशीतील सरपंच, सदस्य व वीज ग्राहकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना तसेच शिवापूर सरपंच यांच्यावतीने करण्यात येत आहे.

कुडाळ येथे झालेल्या बैठकीत माणगाव खोऱ्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या शिवापूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ.सुनीता शेडगे यांनी शिवापूर येथे १५/१५ दिवस विजेचा पत्ताच नसतो अशी शोकांतिका सांगितली होती. वीज ग्राहक संघटनेने सदर बाब गांभीर्याने घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना बुधवार दिनांक २५ जून रोजी शिवापूर येथे पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह बैठक घेण्याचे आवाहन केले होते.

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने शुक्रवारी जिल्हाभरातील वीज ग्राहकांसह अधीक्षक अभियंता यांची भेट घेत जिल्ह्याच्या वैभववाडी, देवगड ते दोडामार्ग पर्यंतच्या सर्व समस्यांचा पाढा वाचला होता. महावितरणने मौसमी पावसाच्या पूर्वार्धात करावयाची कामे पूर्ण न केल्याने वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने महावितरणाच्या कारभारावर वीज ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा