You are currently viewing विजयदुर्गातून ‘आयएनएस गुलदार’चा वेंगुर्लेकडे प्रवास

विजयदुर्गातून ‘आयएनएस गुलदार’चा वेंगुर्लेकडे प्रवास

विजयदुर्गातून ‘आयएनएस गुलदार’चा वेंगुर्लेकडे प्रवास

पाण्याखालील पर्यटनासाठी युद्धनौका समुद्रात बुडविण्याची तयारी

देवगड :

भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी ‘आयएनएस गुलदार’ ही युद्धनौका तब्बल १४ महिन्यांनंतर विजयदुर्ग बंदरातून रविवारी सायंकाळी ५ वाजता वेंगुर्लेकडे रवाना झाली. १५ मार्च २०२५ रोजी ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात दाखल झाली होती.

भारतीय नौदलाच्या सेवेत महत्त्वाची भूमिका बजावलेली ही निवृत्त युद्धनौका यापूर्वी कारवार नौदल तळावर होती. सुमारे ८१ मीटर लांबी आणि १२०० टन विस्थापन क्षमता असलेल्या या जहाजावर ३० मिमी क्लोज रेंज गन तसेच रॉकेट लाँचर्सची सुविधा होती. ३० डिसेंबर १९८५ रोजी ‘आयएनएस गुलदार’चा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला होता.

युद्धसज्जतेबरोबरच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्य, अडकलेल्या नागरिकांची सुटका आणि आपत्कालीन साहित्य वितरणासाठीही या जहाजाचा प्रभावी वापर करण्यात आला होता. सेवामुक्त झाल्यानंतर हे जहाज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले आणि त्यानंतर ते विजयदुर्ग बंदरात आणण्यात आले होते.

दरम्यान, विजयदुर्ग बंदरात उभी असलेल्या या युद्धनौकेतील सर्व साहित्य काढून जहाज पूर्णपणे रिकामे करण्यात आले. त्यानंतर वेंगुर्ल्याकडे नेण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली होती.

वेंगुर्ले येथील लाईट हाऊस परिसरालगत समुद्रात ही युद्धनौका नियंत्रित पद्धतीने बुडविण्यात येणार असून, त्या माध्यमातून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पाण्याखालील पर्यटन विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा