You are currently viewing दर्जेदार इमारती व सुविधांयुक्त जि. प. शाळांमधील कमी होणारी पटसंख्या चिंतेची बाब : आम.नितेश राणे

दर्जेदार इमारती व सुविधांयुक्त जि. प. शाळांमधील कमी होणारी पटसंख्या चिंतेची बाब : आम.नितेश राणे

जिल्हा परिषद, शिक्षक, पालक आणि लोकप्रतिनिधी यांनी विचार करणे काळाची गरज

नवाबाग शाळा नं. १ चा सभागृह भुमिपूजन कार्यक्रम संपन्न

वेंगुर्ले
सिंधुदुर्ग जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी चांगल्या सुविधा पुरविल्या जात आहेत. सुंदर अशा इमारती उभारल्या जात असून अद्ययावत सुविधांनी शाळा सुसज्ज होत आहेत. मात्र त्याच वेळी शाळांची दिवसेंदिवस कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे ही पटसंख्या वाढवण्यासाठी काय करता येईल याकडे जिल्हा परिषद, शिक्षक, पालक आणि लोकप्रतिनिधी या सर्वांनीच एकत्र येत विचार करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.
वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा नवाबाग शाळा नं. १ च्या सभागृह भुमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य विष्णुदास उर्फ दादा कुबल, प्रितेश राऊळ, वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक मनिष दळवी, मच्छिमार नेते वसंत तांडेल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादा केळुस्कर, उभादांडा उप सरपंच गणपत केळुस्कर, तसेच बाबली वायंगणकर, सुजाता देसाई, नगरसेविका कृपा गिरप मोंडकर, प्रसाद पाटकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, कमलेश गावडे, तृषार साळगांवकर, नितिन चव्हाण, शाळेच्या मुख्याध्यापिका तन्वी रेडकर, रामा पोळजी, मारुती गढूळकर, प्राजक्ता आपटे, रामचंद्र आरावंदेकर, नारायण तारी, उत्तम आरावंदेकर, श्यामसुदर कोळंबकर, वैष्णवी केळुस्कर, अक्षरा गोकरणकर आदी उपस्थित होते.

सुरुवातीस नवाबाग ग्रामस्थाच्यावतीने आमदार नितेश राणे याचा सत्कार करण्यात आला. तसेच या शाळेच्या माजी विद्यार्थीनी दिव्यता मसुरकर हिने वक्तृत्व स्पर्धेत तर लिलावती केळुस्कर हिने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा नितेश राणे याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या शाळेत सुरु करण्यात आलेला एमएससीआयटी कोर्स पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आमदार राणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे देण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार राणे पुढे म्हणाले की, आमचे मार्गदर्शक नारायण राणे यानी शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यामुळेच आपला जिल्हा २०१४ पर्यंत साक्षरतेमध्ये पहिल्या दहात होता. कोकण बोर्ड हा दहावी परिक्षेत एक नंबरला असतो. या सर्वांचे श्रेय हे नारायण राणे यांनाच आहे. येथील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे तर त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. येथील जि. प. सदस्य दादा कुबल हे नियोजन समितीच्या सभेत या भागातील प्रश्न तळमळीने मांडतात. त्यामुळेच या भगातील शाळाना आज चांगल्या सुविधा मिळत आहेत. मात्र आज येथेच नव्हे तर संपुर्ण सिधुदुर्ग जिल्हयातील शाळामध्ये पटसंख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे इतर क्षेत्रात जसे वेगवेगळे प्रयोग होतात तसे प्रयोग शिक्षण क्षेत्रातहि होणे आवश्यक आहेत. त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले
यावेळी दादा कुबल यांनी या सभागृहाचा वापर विध्यार्थ्यां प्रमाणेच गावातील छोटया मोठया कार्यक्रमासाठी केला जाणार असून त्यातुन मिळणारा निधी शाळेच्या देखभाल दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार वसंत तांडेल यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =