You are currently viewing कुडाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी गिरविला दातृत्वाचा धडा

कुडाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी गिरविला दातृत्वाचा धडा

कुडाळ :

‘शालेय जीवनात दातृत्वाचा झालेला संस्कार भविष्यात तुम्हाला एक मोठा दाता होण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल ‘ असे आशीर्वाद ज्ञानयज्ञ एक मदतीचा हात या संस्कारक्षम वर्गाने राबविलेल्या कार्यक्रमामध्ये कमशिप्र मंडळाचे उपाध्यक्ष का आ सामंत यांनी दिला . या प्रसंगी कुडाळ हायस्कूल ज्यु कॉलेजचे मुख्याध्यापक विपिन वराडे , उपमुख्याध्यापक प्रवीण भोगटे , पर्यवेक्षक रंजन तेली इत्यादी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण दिल्यास ते दीर्घकाळ ध्यानात राहते. यासाठी कुडाळ हायस्कूल नेहमीच कृतियुक्त शिक्षणावर भर देते. दुसऱ्याचा सहृदयतेने विचार करणे, त्याच्या गरजा ओळखून योग्य वेळी योग्य ती मदत करणे या गोष्टी माणूसकीसाठी पोषक आहेत . याचाच एक भाग म्हणून दहावी इ वर्गातील मुलांचा संस्कारक्षम वर्ग कार्यरत आहे. या वर्गाच्या वतीने ‘ज्ञानयज्ञ – एक मदतीचा हात’ हा उपक्रम राबविण्यात आला. या वर्गात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले खाऊचे पैसे किंवा साठविलेले पैसे गोळा करून त्यातून गरजू विद्यार्थ्यांसाठी एक रक्कम जमा केली. त्यातून आवश्यक शैक्षणिक साहित्याची खरेदी केली. प्रशालेतील होतकरू व गरजू अशा मुलांचा शोध घेऊन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानयज्ञ तेवत ठेवण्यासाठी आपण एक छोटीशी मदत देत आहोत याचा आनंद सहभागी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मुख्याध्यापक वराडे यांनी मुलांच्या या उपक्रमाचे कौतुक करीत त्यांना प्रेरणा दिली. प्रवीण भोगटे, रंजन तेली यांनीही सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला उपस्थित राहून मुलांशी संवाद साधता आला याचा आनंद का आ सामंत यांनी व्यक्त केला. प्रशालेचे शिक्षक एकनाथ जाधव यांनी मुलांना वस्तुरूपाने मदत करीत मुलांचा उत्साह वाढविला. या संस्कारक्षम वर्गाचे संस्थापक व मार्गदर्शक म्हणून प्रशालेचे सहाय्यक शिक्षक सुरेंद्र गोसावी काम पाहतात. त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

वर्गशिक्षक मंदार देऊसकर, विनोद तांबडे यांनी उपस्थित राहून मुलांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुंधाशू महेश धुरी , प्रास्ताविक श्रेयश प्रवीण खोचरे याने तर आभार स्वराज धोंडी मसुरकर याने व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केदार अविनाश घाटगे, रुद्र गीतेश कुडकर, प्रेम मारोती ओंबासे, तन्मय राहुल नाडकर्णी, अथर्व संजय पट्टेकर, गौरव जगन्नाथ जुवेकर , दीपेश धोंडी मसुरकर, अथर्व नागेश तवटे, रोहित रामचंद्र खाकर या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्व शिक्षक, पालक यांनी कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा