You are currently viewing पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कणकवली मतदारसंघात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कणकवली मतदारसंघात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली :

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्व १७० गावांमध्ये धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील संपर्क कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध धार्मिक तसेच कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाध्यक्ष राजन चिके,माजी उपसभापती संतोष कानडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर,श्रीकृष्ण परब,रामू विखाळे, समीर प्रभुगावकर,आण्णा कोदे,गणेश तळगावकर, पंढरी वायंगणकर,बंड्या मांजरेकर,अभिजित सावंत उपस्थित होते.

सलग तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आलेल्या नामदार नितेश राणे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये प्रथमच थेट कॅबिनेटमंत्रीपदी वर्णी लागली. तसेच सिंधुदुर्ग च्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही नामदार नितेश राणे यांच्यावर सोपविण्यात आली. कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाल्यानंतर २३ जून रोजी नामदार नितेश राणे यांचा पहिलाच वाढदिवस साजरा होणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ जून रोजी कणकवली देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील सर्व १७० गावांतील ग्रामदैवत मंदिरात अभिषेक केला जाणार आहे. पालकमंत्री नितेश राणेंना दीर्घायुष्य लाभण्यासाठी ग्रामदैवताना साकडे घालण्यात येणार आहे. कणकवली तालुक्यात भाजपाच्या विभागनिहाय विविध कार्यक्रमांचे आयोजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे. फोंडा घाट विभागात दिनांक २२ जुन रोजी फोंडाघाट येथे महाआरोग्य शिबिर भरविण्यात येणार आहे. या महाआरोग्य शिबिरात विविध मोफत तपासणी तसेच औषधोपचार केले जाणार आहेत. २३ जून रोजी गांगेश्वर मंदिर लोरे नं.१ येथे अभिषेक करण्यात येणार आहे. २३ जून रोजी फोंडाघाट विभागातील २ हजार विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केले जाणार आहे. नांदगाव विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत दशावतार कलाकारांचा संयुक्त नाट्यप्रयोग दि २३ जून, ८.०० वाजता नांदगाव मधली वाडी येथे संपन्न होणार आहे. तरळे खारेपाटण विभागात २२ जून रोजी पालकमंत्री चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न होणार आहे.

दि.२३ रोजी रस्सीखेच स्पर्धा होणार असून गांगेश्वर मंदिर येथे महाआरती होणार आहे. कळसुली विभागात दिनांक २३ जून रोजी कळसुली येथे आरोग्य शिबीर भरविण्यात येणार आहे. वागदे बोर्डवे विभागात कुपोषित मुलांसाठी शिबिर व संगोपन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कलमठ विभागात दि २३ जून रोजी सकाळी ग्राम देवतेच्या मंदिरात अभिषेक करण्यात येणार असून नंतर वृक्षारोपण केले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. निराधार महिलांसाठी मदत करण्यात येणार असून सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जाणार आहे.

वरवडे गावातील सर्व शाळांमध्ये बाल आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. वागदे येथे सकाळी साडे दहा वाजता गावातील कुपोषित बालकांना तीव्र व मध्यम तीव्र कुपोषित मुलांना ग्रामपंचायत मार्फत कायमस्वरूपी विटामिन सिरप वाटपाची सुरुवात करण्यात येणार आहे. बेळणे येथे शालेय विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात येणार आहे. याच धर्तीवर वैभववाडी आणि देवगड तालुक्यातही नियोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा