तुषार परब यांनी पटकाविले कांन्स्यपदक
सावंतवाडी :
मुंबई-वरळी येथे 28वी कॅप्टन एस.जे. इझीकील मेमोरियल स्टेट शूटिंग चॅम्पिनशिप स्पर्धा घेण्यात आली. यात मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, धुळे येथून स्पर्धक सहभागी झाले होते. यास्पर्धा 10 मीटर एअर रायफल,पिस्तूल, 25 मीटर पिस्तूल तसेल 50 मीटर रायफल व पिस्तूल प्रकारात घेण्यात आल्या. सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व करणारे तुषार काशीराम परब वेंगुर्ला यांनी 50 मीटर 22 रायफल प्रोन प्रकारात 600 पैकी 543 गुण मिळवून कांस्य पदक पटकाविले.
या कामगिरीच्या जोरावर त्यांची पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी मेन्स व मास्टर मेन्स गटातुन निवड झाली आहे. त्याच प्रमाणे 10 मिटर पीप साईट प्रकारात सब युथ गटात निलराज निलेश सावंत (सावंतवाडी) याने 400 पैकी 385 गुण मिळविले तसेच गौरव दत्तप्रसाद आजगावकर (वेंगुर्ला) याने 400 पैकी 381गुण,शिवम नरेंद्र चव्हाण (सावंतवाडी) याने 400 पैकी 380 गुण, विधान विठ्ठल धुरी (वेंगुर्ला) याने 400 पैकी 366 गुण, मुलींच्या गटात ईश्वरी गणेश आंबेरकर (कणकवली) 400 पैकी 366 गुण, कु. हंसिका आनंद गावडे (सावंतवाडी) हिने 400 पैकी 349 गुण मिळविले. 10 मीटर पिस्तूल प्रकारात खुल्या गटात स्वानंद प्रशांत सावंत (सावंतवाडी) याने 400 पैकी 348 गुण तसेच याच क्रीडा प्रकारात जुनिअर गटात पार्थ नवनीत देसाई (बांदा) 400 पैकी 342 गुण मिळवले. 50 मीटर 22 पीपसाईट रायफल क्रीडा प्रकारात दत्तप्रसाद आजगावकर (वेंगुर्ला) यांनी 600 पैकी 538 गुण मिळविले. या सर्व खेळाडूंची निवड पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी झाली आहे. हे सर्व खेळाडू सावंतवाडी व वेंगुर्ला येथील उपरकर शूटिंग अकॅडमी येथे प्रशिक्षक कांचन उपरकर यांच्या मार्गदर्शना खाली सराव करत आहेत.
निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक श्री. उपरकर,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले, जिल्हा क्रीडा कार्यालय, ओरोस तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.