निलेश राणेंच्या कामाच्या धडाक्याने ठाकरे शिवसेनेच्या पोटात दुखणे हे स्वाभाविकच – दीपक पाटकर
अज्ञान पाजळणाऱ्या महेंद्र म्हाडगुतांना जनता गांभीर्याने घेत नाही…
मालवण
आपल्या चालवत असलेल्या लॉजींग पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन जनतेचे प्रश्न जाणून घेण्याचे सौजन्य ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ता महेंद्र म्हाडगूत यांना वाटले नाही. त्यात त्यांची चूक नसावी कारण वस्तुतिथी न पाहता “खोटे बोला पण रेटून बोला” या वृत्तीने आपले ज्ञान पाजळणे हे महेंद्र म्हाडगुत अनेक वर्ष करत आले आहेत. त्यामुळे जनता पण त्यांना गांभीर्याने घेत नाही अशी टीका शिवसेना शहर प्रमुख दीपक पाटकर यांनी केली आहे.
मालवण ग्रामीण रुग्णालयात दर्जेदार आरोग्य सेवा, अद्ययावत यंत्रणा आणण्याचे प्रयत्न कार्यतत्पर आमदार निलेश राणे करत आहेत. त्यांना जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. हे पाहून ठाकरे शिवसेना गटाच्या पोटात दुखणार त्यांना जुलाब होणार हे स्वाभाविकच आहे. मुळात यांच्या माजी आमदार नाईक यांनी दहा वर्षात काहीच केले नाही. अनेक समस्या कायम राहिल्या. रुग्णालयाच्या पद भरतीचा प्रश्न ते का सोडवू शकले नाहीत याचा खुलासा पोपट पंची करणाऱ्या महेंद्र म्हाडगुत यांनी करावा. आमच्या जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी या रुग्णालयास भेट देऊन बरेचसे प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून स्वखर्चाने तात्काळ सोडविले आहेत. यामध्ये नवीन सीसीटीव्ही यंत्रणा, बंद असलेले पाण्याचे फिल्टर, इमारतीवरील शेड यांचा समावेश आहे. स्वखर्चाने काम करायला मोठे मन लागते आणि ते आमच्या नेत्यामध्ये आहे. त्याच्या माजी आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात स्वखर्चाने केलेल्या एका कामाचा पुरावा म्हाडगुत यांनी दाखवावा.
सध्या मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसिसच्या दोन मशीन कार्यरत असून १० पेशंट सध्या उपचार घेत आहेत. औषधसाठा मुबलक असून त्यामधे कुठलीही कमतरता नाही. आणि जर औषध कमतरता असेल तर शिवसेना शाखेमधून स्थानिक बाजारपेठेतून औषध खरेदी करुन ती मोफत देण्याचीही व्यवस्था केली आहे. राहीला प्रश्न पद भरतीचा याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे असे श्री. पाटकर यांनी म्हटले आहे.
आमच्या आमदारांचा कार्यकाळ सुरु होऊन फक्त सहा महिन्याचा कालावधी झाला आहे आणि त्यांची विकासकामांची गाडी सुसाट सुरू आहे. दर आठवड्याला एका कामाचा शुभारंभ होतो नाहीतर उद्घाटन होत. त्यामुळे म्हाडगुत यांनी फक्त त्यांच प्रवक्ता हे पद टिकून राहण्यासाठी कुठलीही माहिती न घेता करत असलेली पोपटपंची बंद करावी. आपणच हे सगळे प्रश्न विचारून आपले माजी आमदार आपल्या काळात या सुविधा परिपूर्ण करण्यात कसे अपयशी ठरले यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे म्हाडगुत आपण बोलत रहा. तुम्हाला तेच काम करायचे आहे. तुम्ही आणि तुमचे माजी आमदार काही करू शकत नाही हे जनता ओळखून आहे. मात्र आम्ही जनतेशी बांधील असून शासनाच्या माध्यमातून अथवा आवश्यकता असेल तिथे स्वखर्चातून आम्ही जनतेची सेवा करत राहणार. असेही श्री. पाटकर यांनी स्पष्ट केले.