*’लोभ हे गुन्ह्यामागचे मूळ कारण!’ – अविनाश मोकाशी*
*मधुश्री व्याख्यानमाला – अंतिम पुष्प*
पिंपरी
‘कोणतीही व्यक्ती ही जन्मतः गुन्हेगार नसते; परंतु कधी परिस्थिती तर कधी वेगवेगळ्या प्रकारचे लोभ हे गुन्ह्यामागचे मूळ कारण असते!’ असे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अविनाश मोकाशी यांनी अरविंद – वृंदा सभागृह, स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे बुधवार, दिनांक ०४ जून २०२५ रोजी केले. मधुश्री कला आविष्कार आणि दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘गुन्हेगारीचे बदलते स्वरूप आणि कायदे’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना अविनाश मोकाशी बोलत होते. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे सचिव मिलिंद कुलकर्णी, मधुश्रीच्या अध्यक्षा माधुरी ओक, सचिव राजेंद्र बाबर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
राजेंद्र बाबर यांनी प्रास्ताविकातून मधुश्री कला आविष्कार या संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मिलिंद कुलकर्णी यांनी, ‘स्थानिक व्याख्याते आणि वक्तशीर नियोजन ही मधुश्री व्याख्यानमालेची वैशिष्ट्ये स्तुत्य आहेत. स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर हे समाजासाठी समर्पित असलेले कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात सेवा, वाड्.मय, समाजप्रबोधन हे ब्रीद घेऊन त्यांच्या नावाने उभारलेली संस्था पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहे!’ अशी माहिती दिली.
अविनाश मोकाशी पुढे म्हणाले की, ‘सर्वसाधारण विवेक जिथे संपुष्टात येतो, तिथून कायद्याचे काम सुरू होते; तसेच कोणत्याही कायद्याचे अज्ञान ही पळवाट ठरू शकत नाही. त्यामुळे कायद्याचे किमान ज्ञान आवश्यक आहे. दुर्दैवाने समाजातील पापभीरू व्यक्ती कायद्याविषयी अनभिज्ञ असतात; तर गुन्हेगार त्याचा गैरवापर करण्यात वाकबगार असतात. कोणत्याही प्रकारची शारीरिक, मानसिक, सामाजिक हानी किंवा संपत्तीचे हनन या हेतूने केलेले कृत्य कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा ठरतो. वास्तविक मानवाधिकार ही संज्ञा आपल्याकडे वेदकाळापासून अस्तित्वात आहे. बृहदारण्यक उपनिषदातील ‘सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया’ या श्लोकाचा अर्थ आणि मानवाधिकार कायद्याचा अन्वयार्थ यांत विलक्षण साम्य आहे. माहिती अधिकार कायदा तसेच कालबाह्य ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये शासनाने केलेल्या सुधारणा या नागरिकांना विविध प्रकारच्या गुन्हेगारीपासून संरक्षण देण्यात पुरेशा सक्षम आहेत. अर्थातच नागरिकांनी दक्ष राहून समाजात दडलेले गुन्हेगार ओळखले पाहिजेत. ई-मेल, अनोळखी फोन कॉल्स, सोशल मीडिया या माध्यमातून सायबर क्राईम घडतात. त्यामुळे अपरिचित व्यक्तींशी संपर्क टाळा, अनोळखी व्यक्तीला महत्त्वाची माहिती देऊ नका. कोणताही मेसेज काळजीपूर्वक वाचा. शांतपणे विचार करून नंतरच त्यावर कार्यप्रवृत्त व्हा म्हणजे आर्थिक फसवणूक टाळता येईल.
त्याचबरोबर झटपट लाभ देणाऱ्या फसव्या योजनांपासून लांब राहा!’ विविध उदाहरणे देऊन मोकाशी यांनी विषयाची मांडणी केली. व्याख्यानानंतर त्यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिलीत.
राज अहेरराव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सलीम शिकलगार, प्रदीप पवार, चंद्रकांत शेडगे, रजनी अहेरराव, मनीषा मुळे, अजित देशपांडे, शरद काणेकर, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य पी. बी. शिंदे यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२