कारीवडे धरणात बुडून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू…
सावंतवाडी
कारीवडे धरणावर मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. क्रिश सावियो संभया ( रा. जुना बाजार, सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, क्रिश हा काल सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास फोटो काढायला जात असल्याचे घरी आईला सांगून आपल्या दुचाकीने मित्र-मैत्रिणींसह कारीवडे धरणावर फिरायला गेला होता. धरणाच्या ठिकाणी फोटो काढत असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो पाण्यात पडला. ही घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तसेच बाबल अल्मेडा यांच्या रेस्क्यू टीमने सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत धरणाच्या पाण्यात क्रिशचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. अखेर, रात्री ११ वाजता त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. त्यानंतर तो पाण्यातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.